मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी जुलैमध्ये निवडणूक (Rajyasabha Election) होणार आहे. त्यासाठी भाजपचे दोन तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल इतकं संख्याबळ आहे. अशावेळी सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा देण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. संभाजीराजेंच्या या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिसाद दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचा संभाजीराजेंना पाठिंबा असल्याचं पवार काल म्हणाले होते. मात्र, शिवसेना राज्यसभेसाठी दोन उमेदवार देणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे संभाजीराजेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.
संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना करत आपण राज्यसभेसाठी अपक्ष उभे राहणार असल्याचं जाहीर केलं. तसंच सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन पाठवावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मात्र, संभाजीराजे यांची राज्यसभेसाठीची वाट खडतर असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शिवसेना सहाव्या जागेवर उमेदवार देणार असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे संभाजीराजेंचं दुसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीकडून पाठिंबा जाहीर केला आहे. पवार म्हणाले की, महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात. याव्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ, असं पवार म्हणाले होते. मात्र, अनिल परब यांनी शिवसेना दोन उमेदवार देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे का? असा सवाल आता उपस्थित होतोय.
छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याकरिता संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी 10 अनुमोदक आमदारांची व निवडून येण्यासाठी एकूण 42 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. याकरिता अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे, तर या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे.