मुंबई: नागपूरमध्ये धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात दिल्लीतील आपच्या मंत्र्याने हजेरी लावली. या सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (babasaheb ambedkar) यांनी आपल्या अनुयायांना दिलेल्या 22 प्रतिज्ञा वाचण्यात आल्या. त्यात राम, कृष्ण यांना देव मानणार नसल्याचा उल्लेख आहे. आपच्या नेत्याने ही प्रतिज्ञा घेतल्याने भाजपने त्याला विरोध केला आहे. भाजपने (bjp)आप नेत्याला हिंदू विरोधी ठरवले आहे. यावरून वाद सुरू असतानाच भाजप सरकारमधीलच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 22 प्रतिज्ञांचं समर्थन केलं आहे. आम्हाला 22 प्रतिज्ञांचा अभिमान आहे. या प्रतिज्ञा आम्हाला मान्य आहेत आणि प्रत्येक बौद्धाने या प्रतिज्ञांचं पालन केलं पाहिजे, असं रामदास आठवले (ramdas athawale)यांनी म्हटलं आहे. आठवले यांच्या या भूमिकेमुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.
रामदास आठवले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रामदास आठवले यांनी मध्यंतरी 22 प्रतिज्ञेबाबत आपली भूमिका मांडली होती. मात्र, त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला. त्यावर खुलासा करताना त्यांनी हे विधान केलं आहे.
बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी ऐतिहासिक धर्मांतर केले होते. यावेळी त्यांनी देशभरातील आपल्या लाखो अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. या प्रतिज्ञा आम्हाला मान्य आहेत. या प्रतिज्ञांचा आम्हाला अभिमान असून या 22 प्रतिज्ञा बौद्ध आदर्श जीवनमार्ग शिकविणाऱ्या आहेत. आम्ही या प्रतिज्ञांचे पालन करतो, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
प्रत्येक बौद्धाने या 22 प्रतिज्ञाचे पालन केले पाहिजे. धम्म दीक्षा विधीमध्ये हिंदू धर्मातून धर्मांतर करून बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या प्रत्येकाला या 22 प्रतिज्ञा दिल्या जातात, असं सांगतानाच 22 प्रतिज्ञांच्या भूमिकेबाबत समाज माध्यमांवर काही ठिकाणी अपल्याबाबत चुकीची बातमी प्रसारित होऊन अपल्याबाबत गैरसमज पसरविण्यात येत आहेत, असं ते म्हणाले.
मी स्वतः बौद्ध असून 22 प्रतिज्ञाला माझा कायम पाठिंबा राहिला आहे. त्यामुळे मी कधीही 22 प्रतिज्ञाना विरोध केला नाही. जर कुठे माझ्या वक्तव्यातून तसा अर्थ बोध होत असेल तर मी स्वतः त्या शब्दांना मागे घेतो. मात्र मी कधीही वेगळी आणि चुकीची भूमिका घेतली नाही. या 22 प्रतिज्ञांना मी कधीच विरोध केला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
बाबासाहेबांना मुंबईच्या रेसकोर्सवर भव्य धर्मांतर सोहळा घडवून आणायचा होता. पण त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा मी निर्धार केला होता. त्यानुसरा आम्ही 2006मध्ये रेसकोर्सवर धम्मदीक्षा सोहळ्याचं आयोजन केलं होतं. याशिवाय वर्ल्ड बुद्धिस्ट सोसायटी या बौद्धांच्या जागतिक संघटनेच्या उपाध्यक्षपदीही मी काम केलं आहे. त्यामुळे 22 प्रतिज्ञांना माझा विरोध कसा असेल? असा सवाल आठवले यांनी केला आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावरील गैरसमजावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन आठवले यांनी केलं आहे.