शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांना घरातूनच आव्हान मिळणार आहे. खेड-दापोली हा भाग रामदास कदम यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण आता सख्खा-चुलत भाऊच रामदास कदम यांच्यासमोर उभा ठाकणार आहे. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात चुरशीचा राजकीय सामना पहायला मिळू शकतो. मागच्या काही वर्षांपासून खेड-दापोली मतदारसंघावर रामदास कदम यांच वर्चस्व आहे. सध्या त्यांचा मुलगा योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे. आता रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रचार करणार आहेत.
खेडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अनिकेत कदम यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा बॅनर लावले आहेत. अनिकेत कदम हे विद्यमान आमदार योगेश कदम यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत. घरगुती वाद आता राजकारणापर्यंत पोहोचला आहे. अनिकेत कदम हे उद्योजक सदानंद कदम यांचे सुपुत्र आहेत. दापोली विधानसभेत कदम यांना कदमांचेच आव्हान असणार आहे.
सदानंद कदम कोण?
अनिकेत कदम यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार व त्यांचे सख्खे चुलत भाऊ योगेश कदम यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. अनिकेत कदम यांचे वडील सदानंद कदम हे उद्योजक असून त्यांचे या मतदारसंघात चांगले वलय आहे.
सदानंद कदम यांची ताकद काय?
या आधी झालेल्या दापोली तसेच खेड नगरपालिकेमध्ये सदानंद कदम यांच्याच शहर विकास आघाडीने यश मिळवले होते. अनिकेत कदम यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण खेड दापोली मतदारसंघात शुभेच्छांचे बॅनर झळकताना पाहायला मिळत आहेत.