कृष्णकांत साळगावकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, रत्नागिरी: शिवसेनेचा (shivsena) दसरा मेळावा मुंबईतील (dussehra rally) दादरच्या शिवाजी पार्कात होत आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. हे दोन्ही मेळावे यशस्वी करण्यासाठी आणि जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, शिंदे गटाचे नेते रामदास कदम (ramdas kadam) या दोन्ही मेळाव्यांवर खूश नाहीत. दोन मेळावे होत आहेत. पण मी त्यावर समाधानी नाही, असं विधान रामदास कदम यांनी केलं आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असतानाच रामदास कदम यांनी हे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
रामदास कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. दोन ठिकाणी वेगळा मेळावा होत आहे. जे नको व्हायला पाहिजे ते होत आहे. दोन मेळावे होत आहेत त्यामुळे आपण समाधानी नाही. पक्ष उभा केलाय. केसेस घेतल्या आहेत. सगळं आपण भोगलंय. त्यामुळे दुःख होत आहे, अशी वेदना रामदास कदम यांनी बोलून दाखवली.
शिवसेनेचे भगवे झेंडे दोन्ही ठिकाणी दिसणार आहेत. बाळासाहेबांचे फोटो सुद्धा दोन्ही ठिकाणी असतील. शिवसेनेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. त्याचं आपल्याला दुःख झालंय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दोन मिळावे शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत नाही. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार मांडू शकत नाहीत. बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी लोकं चातकासारखे वाट बघत होते. ते विचार उद्धव ठाकरे देऊ शकत नाहीत. विचार बाळासाहेब यांचेच. बाकी कुणाचे नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे फक्त अफजलखानाचा विषय आणि भाजप टार्गेट असेल, असा टोला त्यांनी लगावला.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते, असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. रामदास कदम यांनी राणेंच्या या सुरात सूर मिसळला आहे. शिवसेनाप्रमुख असते तर उद्धव ठाकरे तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं, असं त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री झाला आणि महाराष्ट्राला वेळ दिला नाही. म्हणून हे सर्व घडलंय, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे निर्णय घेत आहेत असे निर्णय मागच्या अडीच वर्षात होऊ शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
शरद पवारांसारखी व्यक्ती वयाच्या 82 व्या वर्षी संपूर्ण कोकणात फिरते. या कोकणात शिवसेना मोठी केली. मात्र उद्धव ठाकरे कोकणात फिरकलेही नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.