पुणे : सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री रामराजे निंबाळकरांवर निशाणा साधला आहे. निरा डावा कालव्याचा पाणी बारामतीला दिल्याच्या मुद्द्यावरुन रणजितसिंह नाईक निंबाळकर हे रामराजेंना उद्देशून म्हणाले, “रामराजेंनी लाचारी पत्कारत बारामतीपुढं स्वाभिमान गहाण ठेवला आहे.”
नीरा डावा कालव्याच्या पाण्याचा प्रश्न आता चांगलाच चिघळला आहे. नीरा डावा कालव्यातून बारामतीला जाणारं 60 टक्के पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार असून, येत्या एक दोन दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. यासाठी माढ्याचे नवनिर्वाचित भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी पुढाकार घेतला आहे.
वाचा : “माझा डीएनए तपासा, 96 पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील, मात्र रामराजे बिनलग्नाची औलाद”
या प्रकरणी नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तत्कालीन मंत्री रामराजे निंबाळकर यांना जबाबदार धरलं आहे. रामराजेंनी 12 वर्षांपासून वितरण व्यवस्था होऊ दिली नाही आणि या कारणास्तव बारामतीला पाणी दिलं जात असल्याचा आरोप केला आहे. रामराजे यांनी लाचारी पत्करत बारामतीपुढं स्वाभिमान गहाण ठेवल्याचा आरोपही रणजितसिंहांनी केला आहे.
जयकुमार गोरे यांनीही रामराजे आणि पवारांवर टीका केलीय. रामराजे यांनी मातीशी म्हणजे आईशी बेईमानी केल्याचा आरोप जयकुमार गोरेंनी केलाय.
वाचा : बारामतीला निरेतून मिळणारं पाणी बंद, दोन रणजतिसिंहांचा पवारांना शह
2017 नंतर बारामतीला अवैधरित्या पाणी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गोरे यांनी केलीय. पवार मोठ्या उंचीचे नेते असून ज्यांनी प्रेम केलं त्यांच्यावर अन्याय केलाय. पवारांनी आता विरोध करु नये,12 वर्ष तोंडाचा काढून घेतलेला घास मागत असल्याचा दावा गोरे यांनी केलाय.