हात बरबटलेले नसतील तर ईडीची भीती कशाला? तुमचं जर सीडीत काहीच नसेल तर लाऊद्याना सीड्या : रावसाहेब दानवे

| Updated on: Nov 24, 2020 | 7:13 PM

"जेवढ्या ईडीच्या कारवाई आमच्यावर झाल्या तेवढ्या कारवाई यांच्या कुणावर झाल्या नाहीत", असं रावसाहेब दानवे म्हणाले (Raosaheb danve on Shiv Sena MLA Pratap Sarnaik).

हात बरबटलेले नसतील तर ईडीची भीती कशाला? तुमचं जर सीडीत काहीच नसेल तर लाऊद्याना सीड्या : रावसाहेब दानवे
Follow us on

उस्मानाबाद : “ईडी कुणाच्याही घरी येऊ शकते. आमचे हात बरबटलेले नसतील तर आम्हाला काय भीती? केंद्रावर कशाला आरोप करायचे? आमच्याही घरी ईडी आली, आमची देखील सीडी बाहेर काढली, तुमचं जर सीडीत काही नसेल, तर लाऊद्याना लोकांना सीड्या. मन साफ असलं तर काहीही येऊद्या. ईडी आमच्याही घरी येऊ शकते. हे नैराश्यातून केलेले आरोप आहेत”, अशी टीका भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली (Raosaheb danve on Shiv Sena MLA Pratap Sarnaik).

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर ही कारवाई राजकीय सुडबुद्धीतून होत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. याच टीकेला दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं (Raosaheb danve on Shiv Sena MLA Pratap Sarnaik).

“तुम्ही काही केले नसेल तर ईडीची भीती कशाला? ईडी आली आणि सीडी बाहेर काढली असे म्हणून नका, त्या सीडीत काही नसेल तर घाबरता कशाला? या ईडी चौकशीवरुन केंद्रावर केलेले आरोप हे नैराश्यातून करण्यात आले आहेत”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

“जेवढ्या ईडीच्या कारवाई आमच्यावर झाल्या तेवढ्या कारवाई यांच्या कुणावर झाल्या नाहीत. आम्ही सगळ्यातून गेलो. त्यामुळे असं नका समजू की आमच्या चौकश्या झाल्या नाहीत. आमच्यावरही ईडीची कारवाई झाली. काहीजण जेलमध्ये गेले. पण काही साध्य झाले नाही. आता त्यांच्यावर कारवाई होत आहे तर आमच्यावर आरोप करत आहेत”, असा घणाघात दानवेंनी केला.

“राज्य सरकार हे सर्व आघाडीवर अपयशी ठरलं आहे. त्यांच्यात अतिवृष्टी, मराठा आरक्षणसह इतर विषयात समन्वय नाही. त्यांचा एकमेकांवर भरोसा नाही. एकमेकांच्या हेवादाव्यामुळेच हे सरकार कधीही पडू शकतं, त्याला वेळ लागणार नाही”, असं भाकीत रावसाहेब दानवे यांनी केलं. दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या या भाकीतावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे.

“दानवे ज्योतिष शास्त्राचे जाणकार असल्याचा आणि उद्याचे चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण मला माहीत नव्हता”, असा टोला शरद पवार यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला. याबाबत रावसाहेब दानवे यांना प्रश्न विचारला असता, “शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मात्र राज्य सरकारच्या कारभारावर जनता नाराज आहे. प्रश्न माझ्या भविष्यवाणीचा नाही तर त्यांच्या राज्य सरकारच्या भविष्याचा आहे”, असं प्रत्युत्तर दानवे यांनी दिलं.

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कोणा एकाचा अधिकार नाही. ते सर्वांचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलणे योग्य नाही. शिवसेनेची भूमिका आता पहिल्यासारखी हिंदुत्ववादी राहिली नाही. त्यामुळे जनमानसात शिवसेनेबाबत भावना राहिलेली नाही. ती या पदवीधर निवडणुकीत दिसून येईल” असं दानवे म्हणाले.

“अतिवृष्टीबाबत जर राज्य सरकारने केंद्राची मदत मिळण्यासाठी सर्व प्रक्रिया पार पाडल्या तर नक्की केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करेल”, असं दानवे यांनी सांगत राज्य सरकारने मदतीसाठी प्रस्ताव दिला नसल्याचा आरोप केला.

“मोदी हे जागतिक पातळीवरील नेतृत्व असून भारताची लोकसंख्या जास्त असतानाही चीनच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. जपान, इटलीच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. लॉकडाऊन लावल्याने स्तिथी नियंत्रणात राहिली. अमेरिका सारख्या देशाला औषधांचा पुरवठा केला. मोदी जे निर्णय घेतील ते सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी असेल”, असं दानवे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Exclusive: प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांची ‘सामना’च्या कार्यालयात भेट; दीड तास गुप्त चर्चा

आम्ही शहीद होऊ, पण गुडघे टेकणार नाही, शिवसेना सरनाईकांच्या पाठीशी : संजय राऊत

प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई योग्यच; सोमय्यांकडून समर्थन