आओ चोरो, बांधो भारा, आधा तुम्हारा, आधा हमारा; दाजींनी एका वाक्यात उडवली आघाडीच्या सभेची खिल्ली

| Updated on: Apr 03, 2023 | 11:31 AM

महाविकास आघाडीच्या काल झालेल्या सभेला प्रचंड गर्दी होती. पण या सभेवर रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. अशी गर्दीतर आम्हीही जमवू शकतो. त्यात काय एवढं? असा सवाल त्यांनी केला आहे.

आओ चोरो, बांधो भारा, आधा तुम्हारा, आधा हमारा; दाजींनी एका वाक्यात उडवली आघाडीच्या सभेची खिल्ली
raosaheb danve
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : महाविकास आघाडीची काल संभाजीनगरात मोठी सभा पार पडली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. मराठवाड्याने पाहिली नाही अशी ही सभा होती. या सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. महाविकास आघाडीच्या या शक्तीप्रदर्शनामुळे संभाजीनगरातीलच नव्हे तर राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं असतानाच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आघाडीच्या सभेची खिल्ली उडवली आहे. आओ चोरो, बांधो भारा, आधा तुम्हारा, आधा हमारा, अशी ही सभा होती, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी सभेची खिल्ली उडवली आहे.

रावसाहेब दानवे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना कालच्या संभाजीनगरमधील सभेबाबत छेडलं. त्यावर रावसाहेब दानवे यांनी खास आपल्या शैलीत टीका केली. संभाजीनगरात आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा, आधा हमारा… अशी या तिघांची अवस्था आहे. तिघे मिळून एवढी सभा होत असतील तर एकटी भाजपही एवढी सभा घेऊ शकते. तिघांची मिळून ती सभा आहे. आम्हीही शक्तीप्रदर्शन करू. राजकारणात शक्तिप्रदर्शन करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं कामच आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

कुणातच ताकद नाहीये

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला संपुष्टात आणणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचाही रावसाहेब दानवे यांनी समाचार घेतला. भाजपला नामशेष करणारा एकही राजकीय पक्षात देशात अस्तित्वात नाहीये. व्यक्तीतही ती ताकद नाहीये. या देशातील लोकांकडून आणि जागतिक पातळीवरही मोदींच्या नेतृत्वाला मान्यता मिळाली आहे. अशा प्रकारच्या घोषणा आणि वल्गना करणं हे आता त्यांनी विसरून जावं, असा हल्ला दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर चढवला.

पटोलेंचं दुखणं…

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काल महाविकास आघाडीच्या सभेला गेले नव्हते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. नाना पटोले हे काल सभेला नव्हते. पण आज सूरतला जात आहेत. त्यामुळे अधिकच चर्चा रंगली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. नाना पटोलेंच्या पोटातील दुखणं माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहीत आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं.

त्यांचा कोर्टावर विश्वास नाही

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या डिग्रीवर टीका केली आहे. राऊत यांच्या या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. पंतप्रधानां संदर्भात संजय राऊतांना वक्तव्य करतानी थोडं तरी तारत्मय ठेवलं पाहिजे. जेव्हा एखादा विषय सार्वजनिक होतो. आणि सार्वजनिक रित्या त्याचा निर्णय होत नसेल तर अशा प्रकारचे विषय कोर्टात जातात. त्यानंतर कोर्ट जो निर्णय देईल तो सर्वांना मान्य करावा लागतो. परंतु, आजकाल न्यायसंस्थेवरही यांचा भरोसा राहिला नाही. हे प्रकरण न्यायालयात होतं. न्यायालयाने त्यावर निर्णय दिला आहे. आता त्यावर यांनी भरोसा ठेवला पाहिजे, असं ते म्हणाले.

हे कोर्टाच्या कोणत्याच निर्णयावर विश्वास ठेवायला तयार नाही. निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायला तयार नाही. एका बाजूला संविधान बचाव म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला कोर्टाचा निकाल मान्य करत नाही. मला वाटत राऊतांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं.