औरंगाबाद : “महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचं स्टिअरिंग हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे. तर तिसरा पार्टनर मागे बसून सांभाळून चालवा रे आम्ही मागे बसलो आहोत, असं सांगत आहे. दोघांच्या हातात स्टिअरिंग असल्यामुळे ही गाडी झाडावर आदळणार आहे”, असा टोला भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला (Raosaheb Danve slams Maha Vikas Aghadi government).
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“गाडी एक आणि चालवणारे दोन आहेत, स्टिअरिंग दोघांच्या हातात आहे. पण राज्याच्या कारभाराचे स्टिअरिंग एकाच्या हातात असलं पाहिजे. स्टिअरिंगवरील हात निसटला तर अपघात होऊ शकतो”, असं दानवे म्हणाले. त्याचबरोबर “त्यांच्याकडे लायसन्स आणि इन्शुरन्सही नाही”, अशी मिश्किल टिप्पणीदेखील रावसाहेब दानवेंनी यावेळी केली.
दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. “पावसात भाषण केल्याने चांगलं यश मिळतं”, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला (Raosaheb Danve slams Maha Vikas Aghadi government).
“महाविकास आघाडीच्या हातातील स्टिअरिंग आमच्या हातात घ्यावं, अशी आमची इच्छा नाही. त्यांनी राज्यकारभार चांगला करावा, एकत्र राहावं आणि राज्याचं भलं करावं, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही जसं मागच्या पाच वर्षात चांगलं काम केलं, तसं त्यांनीदेखील काम करावं”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
“आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांच्यापैकी कुणाहीसोबत जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. स्वतंत्र निवडणूक लढवू आणि या राज्यात पुन्हा स्वबळावर सरकार स्थापन करु”, असंदेखील रावसाहेब दानवे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हिंगचं कसब, हात सोडून नमस्कार, स्टिअरिंगवर कसलेले हात
‘स्टिअरिंग’वरुन खेचाखेची
महाविकास आघाडी सरकारचं स्टिअरिंग नेमकं कुणाकडे आहे, हा विषय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, सत्तेचं स्टिअरिंग राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे आहे, अशी टीका विरोधी पक्षाकडून नेहमी होते.
दरम्यान, या स्टिअरिंगवरील चर्चेला सुरुवात झाली ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘सामना’तील मुलाखतीवरुन. “महाविकास आघाडी सरकार हे रिक्षासारखंच आहे. या रिक्षाची स्टेअरिंग माझ्याकडे आहे, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष पाठीमागे बसले आहेत”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘सामना’च्या मुलाखतीत म्हणाले होते.
अजित पवारांकडून स्टिअरिंगवरील फोटो शेअर
मुख्यमंत्र्यांनी स्टिअरिंग आपल्याच हाती असल्याचं सांगितल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 27 जुलै रोजी ट्विटरवर शेअर केलेला फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अजित पवारांनी 27 जुलैला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, दोघांचा एकत्र फोटो शेअर केला होता. उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकाच गाडीत बसले असून गाडीची स्टिअरिंग अजित पवार यांच्याकडे होतं. त्यामुळे अजित पवारांनी जाणीवपूर्वक स्टिअरिंगवाला फोटो शेअर केला की काय अशी चर्चा रंगली.
देवेंद्र फडणवीस यांचा टोला
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्टिअरिंगच्या विधानावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही टोला लगावला होता. “ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग उद्धवजींच्या हातात आहे, पण कुठे जायचं ते मागे बसलेले ठरवतात”, असा टोला फडणवीसांनी लगावला.
‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे यांनी तीन दिवसांपूर्वी “राज्यात तीन मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री, मंत्रालयातून काम करणारे अजित पवार हे दुसरे मुख्यमंत्री, तर शरद पवार हे सुप्रीम मुख्यमंत्री आहेत”, अशी टीका केली. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील राज्यात दोन-तीन मुख्यमंत्री असल्याचा टोला लगावला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी मुंबई ते पुणे आणि त्यानंतर पुणे ते मुंबई असं ड्रायव्हिंग स्वत: केलं. तसं पाहता कोरोना संकट काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:च्या गाडीचं स्टिअरिंग स्वत: सांभाळतात. स्टिअरिंग कुठलंही असो, ते आपल्याच हातात आहे, हे मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा दाखवून दिलं.
हेही वाचा : सरकार तीनचाकी रिक्षाच, स्टिअरिंग माझ्याकडे, दोघे पाठी : उद्धव ठाकरे