राहुल ढवळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, इंदापूर: आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून (baramati) विजय मिळवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी भाजपने (bjp) मिशन बारामती सुरू केलं असून आतापासूनच बारामतीत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) या वारंवार बारामतीत येत असून येथील मतदारांशी संवाद साधत आहेत. दुसरीकडे मात्र भाजपचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पार्टीने या जागेवर दावा सांगितला असून या जागेवर उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपला मोठा हादरा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी भाजपच्या मिशन बारामतीला सुरुंग लावणारं विधान केलं आहे. बारामती लोकसभा जिंकायची ताकद फक्त आणि फक्त महादेव जानकर यांच्यामध्येच आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे बारामती लोकसभेसाठी महादेव जानकर हेच राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार असतील, अशी माहिती काशीनाथ शेवते यांनी दिली आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रासपचे नेते महादेव जानकर यांच्या उपस्थितीत काल इंदापूर तालुक्यातील रुई गावी शेतकरी मेळावा झाला. यावेळी बोलताना शेवते यांनी हे विधान केलं. राष्ट्रीय समाज पक्ष हा पूर्वाश्रमीचा भाजप युतीचा घटक पक्ष आहे.
भाजपने मिशन बारामती हाती घेतलेले असतानाच घटक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनीच बारामती लोकसभा मतदारसंघावर उमेदवार देणार असल्याचे जाहीर केल्याने भाजपच्या मिशनला अंतर्गतच सुरंग लागल्याचे दिसत आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मिशन बारामती आखण्यात आलं. त्यानुसार बावनकुळे यांनी बारामतीत जाऊन मोर्चेबांधणी केली होती. बारामती जिंकण्यासाठी त्यांनी बारामतीत निर्मला सीतारामन यांच्या सभाही लावल्या.
निर्मला सीतारामन या वारंवार बारामतीला येतील असंही त्यांनी सांगितलं. तसेच कोणतीही जागा कुणाची मक्तेदारी नसते, ती मक्तेदारी मोडता येते असं विधान करत बारामती जिंकणारच असा निर्धार बावनकुळे यांनी बोलून दाखवला होता.
आता जानकर यांच्या पक्षाने या जागेवर दावा केल्याने भाजपची अडचण झाली आहे. जानकर हे 2014मध्ये बारामतीतून सुप्रिया सुळेंविरोधात लढले होते. त्यावेळी जानकरांचा 69 हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळी त्यांनी कमळ चिन्हं घेतलं नव्हतं. त्यामुळे रासपने या जागेवर दावा करून भाजपची अडचण केली आहे.