मुंबई : राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाच्या (Hanuman Chalisa) मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. राज्यात बेरोजगारीसह शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. राज्याला लागलेली साडेसाती दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर (Matoshri) हनुमान चालिसाचं पठण करावं असं आवाहन हनुमान जयंती दिनी केली होती. त्यानंतर आज राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं आहे. त्याचवेळी मातोश्रीवर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केलीय. उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसाचं पठण करणार, असा दावा राणा दाम्पत्याने केलाय. त्याचबरोबर विकासाच्या मुद्द्यावरुनही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय. राणा दाम्पत्याच्या पत्रकार परिषदेतील 5 महत्वाचे मुद्दे पाहूया
आण्ही कोणत्या परिस्थितीत हनुमान चालिसा वाचणार आहे. आम्ही उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार. कायदा सुव्यवस्थेचं पालन करणार, पोलिसांना सहकार्य करणार. बाळासाहेब ठाकरे असते तर एकदा नाही शंभरवेळा हनुमान चालिसा वाचण्याची परवानगी दिली असती. मी दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केलं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली. मला मातोश्रीवर जाताना अटक केली, तुरुंगात टाकलं. मला आजही अमरावतीत बंदी करण्यात येणार होतं, तसे पोलिसांना आदेश होते. सरकार तुमचं आहे. तुम्ही आम्हाला आत टाकाल. पण जय श्रीराम आणि बजरंग बलीचं नाव घेण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही. आम्ही गोंधळ करणार नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडवू देणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की तुम्ही येऊ नका, असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय. त्याचबरोबर बाळासाहेबांचे सैनिक असतील तर माझ्यासमोर येऊन हनुमान चालिसा वाचतील, असा टोलाही राणा यांनी शिवसैनिकांना लगावलाय.
बाळासाहेबांच्या विचाराचे सैनिक असते तर आम्हाला हनुमान चालिसा वाचू दिली असती. महाराष्ट्राच्या हितासाठी शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी वाचू दिली असती. महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन ते आम्हाला विरोध करत आहेत. समस्त हिंदू हे पाहत आहेत. ज्यांना आम्ही मुंबईत आलोय हे माहीत नाही. ज्यांनी अमरावतीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मुंबईला पाय ठेवून दाखवा असं म्हटलं होतं. मी पाय नाही, मी जिवंत उभा आहे. हनुमान चालिसा वाचण्यासाठी अशा धमक्या मिळत असतील तर एक नाही शंभर वेळा धमक्या सहन करेल पण आम्ही हनुमान चालिसा वाचणारच. शिवसेना भाजपमुळेच सत्तेत. मोदींचा फोटो लावून आमदार निवडून आणले. आमच्यावर भाजपचं खापर फोडू नये. आम्ही स्वबळावर निवडून आलो आहोत, असंही रवी राणा यावेळी म्हणाले.
हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसा वाटली असती तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. णण ते बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत. महाराष्ट्रावर अनेक संकट आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रावर संकट आलं आहे. हे विघ्न हटवण्यासाठी हनुमान चालिसा वाचण्याची गरज आहे, असा टोला खासदार नवनीत राणा यांनी लगावलाय. तसंच त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले. त्यांनी उद्धव ठाकरेंना हनुमान चालिसा वाचायला सांगावी. हनुमान जयंतीच्या दिवशी उद्धव ठाकरे हनुमान मंदिरात गेले नाही. वीजेचं संकट आहे, बेरोजगारी आहे, शेतकरी शेतमजूरांचा प्रश्न आहे, त्यावर भाष्य करत नाही. मुख्यमंत्री कार्यालयात दोन वर्षानंतर आले आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयात फाईलींचा ढीग आहे. मग मुख्यमंत्र्यांना किती काम असेल तरीही ते मंत्रालयात येत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
बाळासाहेबांनी पदासाठी विचारधारा मरू दिली नाही. समाजासाठी विचार केला आहे. बाळासाहेबांची तिसरी पिढी मंत्रीपदावर जगत आहे. राजकीय पोळ्या भागत आहे. मी मुंबईची मुलगी आहे. माझा जन्म इथलाच आहे, इथेच वाढले. विदर्भाची सून आहे. हनुमान माझ्या पाठिशी आहे. त्यामुळे शिवसैनिक माझं काही करू शकत नाही. शिवसेनेची भाषा योग्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या पार्टीचे लोक अशी विधाने करत असतील तर कायदा सुव्यवस्थेचा भंग करण्याचं काम शिवसैनिकच करत आहेत, असंही नवनीत राणा म्हणाल्या.
आता निवडणुका नाहीत त्यामुळे हा स्टंट नाही. निवडणुकीच्या तोंडावर केलं असतं तर स्टंट समजला गेला असता. मी त्यांच्याच उमेदवाराला पाडून निवडून आले आहे, त्यामुळे मला कुणी शिकवू नये. 16-16 तास काम केल्यानंतर मला जनतेनं निवडून दिलं आहे. संजय राऊतांना मी पोपटचं म्हणते. ते सकाळी सकाळी बोलत असतात. त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. आम्ही भाजपच्या बाजूने आहेत असं ते म्हणत असले तरी त्यात तथ्य नाही. तुम्ही आम्हाला बोलता मग तुम्ही कुणाच्या भरवश्यावर निवडून आलाय. मोदींच्या फोटोवर मते मिळाली. येणाऱ्या काळात गोव्यात मिळाली तेवढीच मते मिळतील, असा जोरदार टोलाही नवनीत राणा यांनी शिवसेनेला लगावलाय.
इतर बातम्या :