लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात आता अभूतपूर्व घडामोडी घडणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड अपयश आलं. या निवडणुकीत मोदी लाट पूर्णपणे फेल गेल्याने छोट्या छोट्या राजकीय पक्षांचं बळ वाढलं आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी छोटे राजकीय पक्ष राज्यात तिसरी आघाडी निर्माण करणार आहे. ही तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुढाकार घेतला आहे. अनेक छोट्या पण ताकदवान पक्षांना सोबत घेऊन रविकांत तुपकर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करणार आहेत.
रविकांत तुपकर यांनी मीडियाशी संवाद साधताना तिसरी आघाडी स्थापन करणार असल्याचं स्पष्ट केलं. आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इतर कोणत्याही राजकीय पक्षाची ऑफर आल्यावर आम्ही कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्याचा निर्णय घेऊ, असं सांगतानाच बच्चू कडू यांच्याशी काल भेट झाली. आम्ही तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत आहोत. या तिसऱ्या आघाडीत येण्यास बच्चू कडू यांनी होकार दिला आहे. पण जो काही निर्णय घ्यायचा तो आम्ही कार्यकर्त्यांना विचारूनच घेऊ, असं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात राजू शेट्टी यांच्याशी अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
तिसरी आघाडी झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढण्याचीही तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघात आम्ही स्वतंत्र उमेदवार देणार आहोत. तसा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे, असं रविकांत तुपकर यांनी सांगितलं. तसेच तुपकर स्वत: विधानसभेची निवडणूक लढणार आहेत, तशी माहिती त्यांनी दिली.
रविकांत तुपकर यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. यावेळी जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, खामगाव, जळगांव जामोद आणि मेहकर विधानसभा लढवण्याचा निर्णय झाला. तसेच आजपासून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पुन्हा एकदा 13 किंवा 14 जुलै रोजी पुण्यात राज्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत राज्यात आणखी कुठे कुठे लढायचे याचा निर्णय होणार आहे. शिवाय राज्यातील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकात सुद्धा उमेदवार उभे करण्यात येणार असून विधानसभेत स्वबळावर लढायचं की तिसरी आघाडी स्थापन करायची याचाही विचार करण्यात येणार आहे, अशी माहितीही तुपकर यांनी दिली.
रविकांत तुपकर यांनी तिसरी आघाडी स्थापन केल्यास आणि या आघाडीला राजू शेट्टी तसेच बच्चू कडू यांची साथ मिळाल्यास राज्यात पहिल्यांदाच विधानसभेत शेतकरी आणि दिव्यांगांची ताकद दिसणार आहे. आजपर्यंत जातीय समीकरणावर निवडणूक लढल्या जात होत्या. मात्र, आता पहिल्यांदाच शेतकरी आणि दिव्यांग एकत्र येऊन निवडणूक हाती घेण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे ही आघाडी कशा स्वरुपात तयार होते आणि आघाडीत कोण कोण सामील होतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.