औरंगाबाद: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना अटक झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (sanjay shirsath) यांनी खोचक टीका केली आहे. ही जैसी करनी वैसी भरनी आहे. राऊत लोकांना नावे ठेवत होते. आता त्यांनाच तुरुंगात जावं लागलं आहे. आधीच दोन मंत्री तुरुंगात आहेत. आता हे तिसरे महाशय तिथे पोहोचले आहेत. राऊत तुरुंगात जाऊन दोन मंत्र्यांबरोबर युतीची गप्पा करणार की काय असं वाटतं, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला. राऊतांनी शिवसेनेला फसवलं. उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) फसवलं आणि बाळसााहेबांना फसवलं. त्यांनी बाळासाहेबांच्या शपथा घेऊन शिवसैनिकांना फसवलं. त्याचं वाईट वाटतं. त्यांनी आपल्या सर्वांचं घर फोडलंय. त्यांच्यापासून सावध राहा असं शिवसैनिकांना आवाहन करतो, असंही शिरसाठ म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.
ईडीच्या लोकांना राऊतांच्या घरी 10 ते 11 लाख रुपये सापडले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. राम मंदिराच्या उभारणीसाठी शिंदे यांनी जे पैसे दिले होते, तेही या माणसाने घरी ठेवले की काय असं वाटतं. जो करेल तो भरेल. त्यामुळे राऊतांवर ही वेळ आली असावी, असा हल्लाही संजय शिरसाठ यांनी चढवला आहे.
संजय राऊत यांना अटक झालेली ही प्रोसेस गेल्या चार सहा महिन्यापासून सुरू होती. चार वेळा नोटीस देणे आणि नोटीसला उत्तर न देणे, हजर न राहने त्यामुळे राऊत यांना ईडीने अटक केली असावी. मला काहीच होणार नाही असा राऊतांना कदाचित अधिक विश्वास असावा. पण ईडी ही अशी संस्था आहे, जी पूर्ण कागपत्र घेतल्याशिवाय कुणावर कारवाई करत नाही. राऊतांकडे दहा-अकरा लाख रुपये सापडले आहेत आणि त्यावर शिंदे साहेबांचे नाव होतं, याचा मला अधिक धक्का बसला. म्हणजे रामाचं मंदिर उभारण्यासाठी शिंदे साहेबांनी दिलेले पैसे तेही या माणसाने घरी ठेवले की काय? असा सवाल त्यांनी केला.
तुम्ही दुसऱ्यांना नावं ठेवणं, दुसऱ्यांची प्रेत यात्रा काढणे, दुसऱ्यांना रेडे म्हणणं, बायांना वेश्या म्हणणं हा सर्व तळतळाट तुम्हाला लागला आहे. आम्हाला नावं ठेवणाऱ्यावर कारवाई झाली, त्यापेक्षा आनंद शिवसेना फोडणाऱ्या त्या संजय राउतांवर कारवाई झाली याचा आनंद थोडा अधिक आहे, असंही ते म्हणाले.