Santosh Bangar: जो हिंदू हित की बात करेगा; शिंदेंच्या हजेरीत संतोष बांगरांच्या घोषणांनी सह्याद्री दुमदुमली

| Updated on: Jul 12, 2022 | 4:35 PM

Santosh Bangar: अधिक कार्यकर्ते आणू शकलो नाही. पाऊस होता म्हणून मोजकेच कार्यकर्ते आणले. कार्यकर्ते मानायला तयार नव्हते. साहेबांना भेटायचं असं सांगत होते. त्यामुळे हट्टाने पेटून कार्यकर्ते आले, असं त्यांनी सांगितलं.

Santosh Bangar: जो हिंदू हित की बात करेगा; शिंदेंच्या हजेरीत संतोष बांगरांच्या घोषणांनी सह्याद्री दुमदुमली
जो हिंदू हित की बात करेगा; शिंदेंच्या हजेरीत संतोष बांगरांच्या घोषणांनी सह्याद्री दुमदुमली
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेना (shivsena) जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आमदार संतोष बांगर (santosh bangar) यांनी थेट मुंबईत येऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. एकनाथ शिंदे (eknath shinde)हे शिवसेनेचेच मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही सर्व शिवसेनेतच आहोत. आम्हाला कोणीही काढलेले नाही, असं सांगत जो हिंदू की बात करेगा, वोही देशपर राज करेगा अशी घोषणाच संतोष बांगर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर दिली. यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी एकनाथ शिंदे यांचा सह्याद्रीच्या पायऱ्यांवरच जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी हिंगोलीचे शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, विभाग प्रमुख, उपप्रमुख, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि विविध समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

आमदार संतोष बांगर यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर ते आपल्या समर्थकांसह सह्याद्री अतिथीगृहावर आले आणि जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. जो हिंदू की बात करेगा, वोही देशपर राज करेगा, अशा घोषणा देत या शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जंगी सत्कार करण्यात आला आहे. कळमनुरी मतदारसंघातील तालुकाप्रमुख, जिल्हा प्रमुख, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शाखाप्रमुख आणि सर्कल प्रमुखांना घेऊन मी इथे आलो आहे, असं बांगर यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

भाई तुम्ही गुरु आहात

जो हिंदू हित की बात करेगा, वोही देश पर राज करेगा, अशी घोषणा बांगर यांनी केली. तुमच्या भेटीसाठी इथे आलो आहे. तुमच्या सत्कारासाठी आलो. राज्यात आनंदाचं वातावरण आहे. भाजप-सेनेची युतीची हवी होती. ती शिंदे यांच्या रुपाने झाली. हिंदू समाज असच म्हणतो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा हवा तर तो एकनाथ शिंदे यांच्या सारखा हवा. भाई तुम्ही गुरू आहात. तुमच्या सारखा नेता फार कमी मिळतो. कार्यकर्त्यांच्या पाठी खंबीर राहणारे नेते शिंदे आहेत, असं त्यांनी सांगितलं.

बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण झालं

शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातील अडीअडचणी चुटकीसरशी सोडवल्या आहेत. दोन्ही तालुक्याचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आहेत. हिंगोलीचे नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. सभापती आहे. तालुका प्रमुख आहेत, शहर प्रमुख आहेत, सर्कल प्रमुख आहेत, सरपंच आहेत. अधिक कार्यकर्ते आणू शकलो नाही. पाऊस होता म्हणून मोजकेच कार्यकर्ते आणले. कार्यकर्ते मानायला तयार नव्हते. साहेबांना भेटायचं असं सांगत होते. त्यामुळे हट्टाने पेटून कार्यकर्ते आले, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या खुर्चीवर निष्ठावंत कडवा शिवसैनिक बसावा असं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते स्वप्न आज पूर्ण झालं आहे, असंही ते म्हणाले.