मुंबई: शिवसेनेत (shivsena) उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केलं आहे. शिवसेनेचे 47 आमदार घेऊन एकनाथ शिंदे आसाममध्ये गेले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तब्बल 10 ते 15 वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसेनेत बंड होत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडल्याने शिवसेनेचे कसं होणार असा प्रश्न विचारला जात आहे. शिवसेना आता संपली आहे, असंही सांगितलं जात आहे. मात्र, या सर्व प्रश्नांवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit pawar) यांनी अचूक भाष्य केलं आहे. शिवसेनेतील बंडाचा इतिहास सांगतानाच शिवसेना ही अभेद्य असल्याचंही त्यांनी दाखवून दिलं आहे. बंड करणारा नेताच राजकारणात टिकतो. त्याच्यासोबतचे नेते टिकत नाहीत, असा आजवरचा शिवसेनेचा इतिहास आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिवसेनेत ज्या ज्यावेळी बंड झालं. त्यावेळी नेते बाजूला गेले. त्यावेळी शिवसैनिक शिवसेनेसोबत राहिले हा इतिहास आहे. मी पाहिलेलं बंड सांगतो. शिवसेनेत छगन भुजबळ यांनी बंड केलं. त्यानंतर नारायण राणे यांचं बंड झालं. ( यावेळी एका पत्रकाराने राज ठाकरे यांचं बंड झालं असं सांगितलं. त्यावर तो घरातला मामला होता गं बाई, असं अजितदादा म्हणाले) त्यात तिसरं आपल्या काळात घडलेलं एकनाथराव शिंदेंचं बंड. माझ्या पाहणीनुसार बंड करणारी व्यक्ती एकवेळ राजकारणात टिकते. पण बाकीचे टिकत नाहीत. शिवसैनिक शिवसेनेसोबत राहतात. बंड करणाऱ्यांसोबत राहत नाहीत. बंड करणाऱ्यांना पराभूत करण्यासाठी शिवसैनिक जीवाचं रान करतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी यावेळी शिंदे यांच्या बंडांशी संबंधित अनेक बाबींवर भाष्य केलं. महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरे यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. हे सरकार कसं टिकेल त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आमचं काम सुरू आहे. आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. आदित्य ठाकरे यांचा एका वेगळ्या कामासाठी फोन होता. त्यांच्याशीही चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं.
आमची दुसरी काही भूमिका नाही. शिवसेनेतील घडामोडीबाबत शिवसेनेचे लोक सांगतील. काही आमदार परत आले आहेत. नितीन देशमुख आणि किशोर पाटील हे परत आले आहेत. तिथे काय झालं ते त्यांनी सांगितलं. त्यांचे आमदार चॅनेलवरून दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. आजही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आवाहन केलं आहे. आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आमची भूमिका आघाडी सरकार टिकवण्याची आहे. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत, असंही ते म्हणाले.