मुंबई : कोर्टाने फरार म्हणून घोषित केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह समोर आले आहेत. त्यांची कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात हजेरी लावली. यावेळी त्यांची गोरेगावातील वसुली प्रकरणाविषयी चौकशी करण्यात आली. तब्बल 7 तास चाललेल्या चौकशीनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचा जबाब नोंदवण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार सिंह यांची उद्यादेखील पुन्हा एकदा चौकशी होऊ शकते. त्यासाठी सिंह पुन्हा एकदा कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात हजेरी लावण्याची शक्यता आहे.
बिमल अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाने परमबीर सिंह आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात करोडोंची वसुली केल्याची तक्रार दाखल केली होती. या आरोपानंतर सिंह यांच्यामागे आता चौकशीचा ससेमीरा लागला आहे. आज तब्बल आठ तास चौकशी झाल्यानंतर तपासात जे सहकार्य करायचे होते ते आम्ही केले आहे आणि करत राहू, अशी प्रतिक्रिया सिंह यांच्या वकिलांनी दिली.
गुन्हे शाखेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन वाझे आणि विमल अग्रवाल यांच्यात काय झाले, याबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. सचिन वाझे यांनी आजवर आमच्या नावावर जे काही जमा केले आहे, त्याची आम्हाला अजिबात माहिती नव्हती. आमच्यावर जे काही आरोप झाले त्यात तथ्य नाही, आम्ही कोणाकडे पैसे मागितले नाहीत,” असे सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला सांगितले आहे.
अनेक वेळा चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतर हजर न झाल्यामुळे मुंबई पोलिसांनी सिंह यांना फरार म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर किला कोर्टाने सिंह यांना फरार घोषित केलं होतं. तसेच आगामी 30 दिवसांच्या आत हजर न झाल्यास संपत्ती जप्ती करण्याची कारवाई करण्यात येईल अशी तंबीदेखील कोर्टाने दिली होती. त्यानंतर आता सिंह मुंबई पोलिसांससमोर चौकशीसाठी हजर झाले.
अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांडानंतर परमीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. परमवीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य ठेवल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर परमवीरसिंह यांच्याविरोधातही तक्रारी येऊ लागल्या. मुंबई आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. यानंतर अटकेच्या भीतीने आजारी असल्याचे कारण दाखवत मे महिन्यात ते सुटीवर गेले होते. चौकशीसाठी समन्स पाठवूनदेखील ते हजर राहात नव्हते. तपास यंत्रणांच्या रडारवरूनही ते दिसेनासे झाल्याने न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. अखेर काल बुधवारी तब्बल सात महिन्यानंतर ते रेंजमध्ये आलेय.
इतर बातम्या :
पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पुन्हा ताकदीने फडकेल, नाना पटोलेंचा विश्वास