काका-पुतण्याचं नातं कसं असावं?…. रितेश देशमुख काय म्हणाले? टोला कुणाला?

| Updated on: Feb 18, 2024 | 1:54 PM

Riteish Deshmukh : राजकारणातील भाषणांचा दर्जा, काका - पुतण्याचं नात, भावाला भावाची असलेली साथ.... यावर रितेश देशमुख यांचं मोठं विधान... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रितेश देशमुख यांच्या वक्तव्याची चर्चा

काका-पुतण्याचं नातं कसं असावं?.... रितेश देशमुख काय म्हणाले? टोला कुणाला?
Follow us on

मुंबई | 18 फेब्रुवारी 2024 : विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात वडील विलासराव आणि त्यांचे भाऊ दिलीपराव देशमुख यांच्याबद्दल बोलत असताना रितेश देशमुख भावूक झाले. ‘कधीही कोणासोबत देखील बोलताना वैयक्तिक रित्या टीका करु नये. आजकल राजकारणात कोणत्या पातळीला भाषणं जातात हे पाहून खरंच दुःख होतं. जो महाराष्ट्र अशा दिग्गज नेत्यांना गाजवला आहे, त्यांच्या भाषणांनी गाजवला आहे. तो काळ आता आपल्याला फारसा दिसत नाही. तो काळ आपल्याला परत आणण्याची गरज आहे…’ असं म्हणत रितेश यांनी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या आठवणी ताज्या केल्या.

‘साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा लातूरला आले, तेव्हा मांजरा साखर कारखान्यावर त्यांचा सत्कारचा कार्यक्रम होता. तेव्हा साहेब देवळात नाही गेले. पहिल्यांदा स्टेजवर आहे दादांच्या पायावर डोकं टेकवलं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि भाषण सुरु केलं…’

‘भाषण सुरु केल्यानंतर साहेब गहिवरले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. एवढी लोकं ऐकत होती, सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं. काय पुढे करायचं कोणाला माहिती नव्हतं कारण साहेब बोलत नव्हते. त्यावेळे काका उठले त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले ‘कम ऑन यू कॅन डू इट…’ एका भावाने दुसऱ्या भावासोबत कसं वागलं पाहिजे याचं उदाहण येथेच आहे..’

‘साहेबांनी आणि दिलीप राव साहेबांनी भाऊ म्हणून एकमेकांना कसं जपलं… आपल्या भावाला आपण कशी साथ देऊ शकतो हिच भावना… साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली…’ वडिलांच्या आठवणी सांगताना रितेश देशमुख भावुक झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

‘साहेबांची उणीव कायम भासते. पण काका कायम सोबत उभे राहिले. गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे. काकांना बऱ्याच वेळा बोलता आलं नाही. पण आता सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे याचं उदाहरण आज या स्टेजवर आहे.’

‘वडील म्हणून कधीच आम्हाला थांबवलं नाही. आई – वडिलांनी मोकळीक दिली होती. फक्त शिक्षण पूर्ण करा. मुलांवर कधीच दबाव आणायचा नाही.. ही त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. मुलांना त्याची स्वप्न जगू द्यायला हवीत. त्यांना आयुष्यात जे करायचं आहे ते करु द्यावं. आपण खंबीरपणे त्यांना हवा द्यावी एवढंच काम त्यांनी केलं. आई – वडिलांना जेव्हा मी घरी पाहायचो तेव्हा वाटायचं लक्ष्मी – नारायणाचा जोडा आहे. कधीही अपशब्द घरी वापरले नाही. हाच गुण आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. साहेबांच्या पुतळा येथे आहे त्यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यावी..’ असं म्हणत विलास सहकारी साखर कारखाण्याचे आभार मानले.