गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके (ramesh latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (rutuja latke) यांच्या नोकरीच्या राजीनाम्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. महापालिका प्रशासनाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा अजूनही मंजूर केलेला नाही. त्यावरून शिवसेनेने (shivsena) महापालिकेसह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर राज्य सरकारचा दबाव असल्यामुळेच लटके यांचा राजीनामा मंजूर केला जात नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या राजीनामा नाट्यावर ऋतुजा लटके यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मशाल चिन्हावरच आपण निवडणूक लढणार असल्याचं ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केलं आहे.
ऋतुजा लटके या आज महापालिका कार्यालयात आल्या आहेत. महापालिकेच्या सहायक आयुक्तांकडे राजीनाम्याबाबतची माहिती घेण्यासाठी त्या आल्या आहेत. यावेळी मीडियाने त्यांना घेरलं असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तुमच्यावर दबाव आहे का? असा सवाल केला असता माझ्या चेहऱ्याकडे पाहून माझ्यावर दबाव आहे, असं तुम्हाला वाटतं का?, असा प्रतिसवाल ऋतुजा लटके यांनी केला.
माझ्या पतीची निष्ठा उद्धव ठाकरे यांच्यासोबत होती. माझीही निष्ठा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे मी मशाल या चिन्हावरच निवडणूक लढणार आहे, असं ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केलं.
मी आयुक्तांना भेटायला आले आहे. आजच माझा राजीनामा मंजूर करा, अशी विनंती मी त्यांना करणार आहे. अधिकाऱ्यांनी राजीनामा स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं सांगितलं. फक्त माझी सही बाकी असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे मी सही करण्यासाठी आले आहे, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्या जागेवर ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके लढत आहेत. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.