मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे (Rohit Pawar answer Devendra Fadnavis). रोहित पवार यांनी जीएसटीच्या थकबाकीवरुन राज्याच्या भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी “रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करुन बोलावं”, असा टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेला रोहित पवारांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट टाकून प्रत्युत्तर दिलं आहे (Rohit Pawar answer Devendra Fadnavis).
“रोहित पवारांना कॅलक्यूलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करुन बोलावं’, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची बातमी मी पाहिली. नेहमी ‘अभ्यास’ करणाऱ्या नेत्याने ‘अभ्यास’ न करताच माझ्यावर टीका का केली? याचं आश्चर्य वाटलं. पण ठीक आहे, बिहारच्या निवडणुकीत व्यस्त असल्यामुळं ‘अभ्यास’ करायला त्यांना वेळ मिळाला नसेल म्हणून त्यांनी टीका केली असावी”, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
“माझा त्यांच्याएवढा ‘अभ्यास’ नाही, पण मी वस्तुस्थिती मांडली. माझ्या कॅलक्युलेशनचं स्पष्टीकरण पुन्हा एकदा देतो. मी नाराजीतून किंवा माझ्याविरोधात कुणी बोललं म्हणून नाही तर वस्तुस्थिती समोर यावी, शाब्दिक खेळ आणि राजकीय टीकाटिप्पणी होऊ नये म्हणून ही टिपणी देतोय”, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
“मला या विषयाचं राजकारण करायचं नाही किंवा करायची इच्छाही नाही. पण आज राज्याची तिजोरी रिकामी आहे. केंद्र सरकारकडून भरपाई देताना अनेक महिने उशीर होतोय. राज्यसमोर मोठं आर्थिक संकट आहे. अशा काळात दुसऱ्याच्या चुका शोधत न बसता आपण केलेली चूक सुधारण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे वेळेत जीएसटी भरपाई देण्याची आणि स्थानिक संस्था करापोटी माफ केलेली रक्कम आधारभूत महसूलात परिगणित करण्याची मागणी त्यांनी केंद्राकडे लावून धरावी. ती मान्य करुन घ्यावी”, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला.
“देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा जीएसटी भरपाई कायदा अभ्यासून कॅलक्युलेशन समजून घ्यावं. जनता त्यांच्याकडं अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून बघते. ते वकीलही आहेत. नगरसेवकापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे, याचं कौतुक आहे. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी टीका जरुर करावी, सरकारच्या चुका निश्चित दाखवून द्याव्यात. त्यात तथ्य असेल तर त्यात सुधारनाही करता येईल”, असं रोहित पवार म्हणाले.
“केवळ राजकीय टीका न करता वस्तुस्थितीचा सकारात्मक विचार करुन राज्याच्या उत्पन्नाचा प्रमुख हिस्सा असलेले जीएसटीचे हक्काचे पैसे मिळण्यासाठी त्यांनी आपलं वजन केंद्रात सत्तेत असलेल्या आपल्या पक्षाच्या सरकारकडे खर्च करावं. असं केलं तर लोक त्यांच्या कामाची दखल निश्चितच घेतील”, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
रोहित पवार यांचं जीएसटीबाबत नेमकं कॅलक्युलेशन काय?
“दर दोन महिन्यांनी जीएसटी भरपाई राज्यांना देणं गरजेचं असतानाही केंद्र सरकार मात्र खूप उशिराने देतं. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 ची भरपाई डिसेंबरऐवजी फेब्रुवारीमध्ये एक टप्पा तर मे मध्ये दुसरा टप्पा अशी दिली गेली. डिसेंबर 2019 आणि जानेवारी-फेब्रुवारी 2020 ची भरपाई जून महिन्यात मिळाली. मार्च 2020 ची भरपाई जुलैमध्ये मिळाली तर 2020-21 च्या एप्रिल, मे, जून, जुलै या चार महिन्यांची भरपाई अद्यापही मिळाली नाही. केंद्राकडून जीएसटी देण्यात होणारी ही दिरंगाईही त्यांना कळायला हवी होती”, असं रोहित पवार फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
“गेल्या महिन्यात केंद्र सरकारने जीएसटी भरपाई पोटी संचित निधी मधून 33 हजार 412 कोटी रुपये दिल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. मात्र 75 हजार कोटी रुपये संचित निधीमधून दिल्याचं विरोधी पक्षनेत्यांनी ठोकून दिलं. याला काय म्हणावं? त्यांना एक सांगायचंय की व्यक्तिगत हीत हे पक्षहितापेक्षा वरचढ व्हायला नको, अन्यथा सत्ता जाते. पक्षहीत राज्याच्या हितापेक्षा वरचढ व्हायला नको अन्यथा राज्य आर्थिक संकटात लोटलं जातं”, असं रोहित पवार म्हणाले.
संबंधित बातम्या :
‘रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, अभ्यास करुन बोलावं’, फडणवीसांचा सल्ला