उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी”ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी एकत्र येऊ नये, असं वक्तव्य केलं. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या जागेवर खासदार सुप्रिया सुळे यांचा पुन्हा विजय होईल, असा दावा राजेंद्र पवार यांनी केला आहे. “पवार कुटुंब आणि राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. जिथे दबाव आहे, तिथे लोक उघड बोलत नव्हते. पण ते सुद्धा आमच्यासोबत आहेत. या निवडणुकीत आतला करंट वेगळा आहे आणि आतला करंट खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत आहे”, असं राजेंद्र पवार म्हणाले.
“घर एकत्र होतं. कुटुंब एकत्र होतं. ते वेगळे पडले. अजित पवारांनी विचारधारा सोडली. अजित पवारांना कुणीही एकटं पाडलं नाही. ते स्वत:च बाहेर पडले. शरद पवार यांना रिटायर्ड व्हा म्हणतात. 3 वेळा कँसरच ऑपरेशन केलं. पायाला पट्ट्या असताना सुद्धा शरद पवार एवढं फिरतात. यावरून समजून घेतलं पाहिजे काय धडपड आहे. नागरीक म्हणून मला वाटतं, शरद पवार यांना संपवण्यासाठी अजित पवारांना जवळ घेतलं. निर्णय प्रक्रियेत मी नाही. रक्ताच्या नात्यात पूर्वीचा ओलावा किती राहील ते माहिती नाही. कार्यकर्ता म्हणून अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र येऊ नये, अशी भावना आहे. अजित दादांनी स्वीकारलेल्या विचारधारेवर ठाम रहावं”, असं राजेंद्र पवार म्हणाले आहेत.
“पवार कुटुंबिय एका पक्षाचे आणि एका विचारधारेचे होते. पण मला असं वाटतं की, विचारधारा बदलल्यानंतर या दोन-दोन गोष्टी होणारच आहेत. अजित दादांनी त्यांची विचारधारा बदलली आहे. त्यामुळे आज दोन सभा लागलेल्या आहेत”, असं राजेंद्र पवार म्हणाले. “आपण फूट पडली असं सारखं म्हणतो. पण एखादी प्रॉपर्टी असली तर फूट पडली असं म्हणू शकतो. पण आम्ही सर्वजण रोहित दादा सोडून, सुप्रिया ताई, अजित पवार आणि शरद पवर सोडून हे तेवढेच राजकारणात आहेत. बाकी आमचा राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त संबंध आहे. त्यामुळे जे विचार आम्हाला योग्य वाटतात, शरद पवारांनी बारामतीचं नाव आख्ख्या देशात पोहोचवलं. ते आमचे प्रमुख आहेत. त्यांची विचारधारा आम्हाला पटली. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत”, असं राजेंद्र पवार म्हणाले.
“अजित पवारांनी कुत्र्याच्या छत्रीचं का नाव दिलं ते मला माहिती नाही. वास्तविक त्यांना अगदी इतिहासात सांगायचं झालं तर मी परदेशातून आल्यानंतर 80-82 साली पहिल्यांदा अजित दादा छत्रपती कारखान्यात उभे राहिले. त्यांच्यासोबत मी घर टू घर घेतलं. यानंतर सेशनच्या काळात जेव्हा खर्चावर लिमिटेशन आलं, तेव्हा आम्ही सायकलवर घर टू घर प्रचार करुन अर्धा तालुका आम्ही फिरलोय. त्यावेळचे अनेक, असंख्य कार्यकर्ते अजूनही आहेत. त्यांच्याबरोबर काही आहेत, तर काही आमच्याबरोबर आहेत. कायम प्रचार करत आलोत. फक्त मागच्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी रोहित पवार उभा होते. त्यांना जास्त गरज होती. म्हणून आम्ही तिकडे प्रचाराला गेलो. पण मला असं वाटतं की, त्यांना ते जाणीवपूर्वक विसरायचं होतं. ते मला वाटतं जाणीवपूर्वक विसरले की, आम्ही त्यांचं काम करत होतो”, अशी प्रतिक्रिया राजेंद्र पवार यांनी दिली.
“अजित पवार हे सर्व इतिहास विसरलेले आहेत. इथे जो इतिहास आहे, शरद पवार यांचं राजकारणात येण्याबाबत, आमच्या आजी 40 सालाच्या दरम्यान इथल्या लोकल बोर्डाच्या मेंबर होत्या. त्यांनी या परिसरात जवळपास 9 वर्षे त्यांनी त्यांच्या परिने काम केलेलं आहे. त्यानंतर मधल्या काळात आमचे आजोबा गोविंदराव पवार हे भारतातलं जे दोन नंबरचं खरेदी-विक्री संघ होते, त्यात ते प्रमुख पदावर होते. नोकरी करत होते. अशावेळेस त्यांनी इतर लोकांना गुळाचा व्यापर करत असताना किंवा उलाढाल करत असताना त्यांचा अनेक शेतकऱ्यांशी संबंध आला. त्यांनी अनेकांना मदतही केली”, अशी माहिती राजेंद्र पवार यांनी दिली.
“याचबरोबर नंतरच्या काळात माझे सर्वात थोरले चुलते वसंतराव पवार यांच्याबरोबर यांची विचारधारा शेकाप पक्षाची होती. ते जेव्हा या परिसरात आले, त्या काळात ते वकील असल्यामुळे त्यांनी अमराई सारख्या परिसरात, इथे गोरगरीब होते. पोलिसांच्या सतत काहीतरी केसेस चालायच्या. तिथे त्यांनी त्यांना कायम मदत केली आहे. अगदी मोफत मदत केली आहे. अशी अनेक लोकांना मदत केली आहे. काही घराणे असे आहेत, उदाहरण द्यायचं की, जामचं घराणं आहे. ते अजूनही आज तीन पिढ्यांपासून तुमच्यासोबत आहे. त्यांची पुढची पिढी त्या आठवणी अजूनही जागरुक करतात. याचा उपयोग शरद पवार यांना 1967 साली झालेला आहे”, असं राजेंद्र पवार म्हणाले.
“शरद पवारांचा उपयोग अजित पवार यांना झालेला आहे. सुप्रिया सुळे यांना झालेला आहे. आमच्यात एक पद्धत आहे, एकाने एक वेळेस राजकारणात राहावं. शरद पवार असताना आप्पासाहेबांनी सर्व सामाजिक कार्य करत असताना त्यांनी राजकीय सपोर्ट केला. पण ते राजकारणात कधी राहिले नाहीत. असं दिसत नाही की, संघर्ष कुठे झालाय. यानंतर मात्र जेव्हा अजित दादा राजकारणात आले तेव्हा शरद पवारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यापुढचा इतिहास सर्वांना माहिती आहे. इथल्या लोकल राजकारणात सुप्रिया सुळे यांनीही लक्ष दिलं नाही. शरद पवारांनी दिलं नाही. आम्ही आमचं काम करत राहिलो. यामुळे कदाचित त्यांना असं वाटायला लागलं की, हे कदाचित मी आणि माझच आहे. असं नसतं”, असं राजेंद्र पवार म्हणाले.
“आम्ही लोकांच्यासोबत होतो. माझ्या पत्नी सुनंदा पवार या देखील सामाजिक कार्य करतात. असंख्य बचत गटांचं काम चालू असतं. त्याच्या मतदारसंघात सुद्धा आणि बाहेरच्या मतदारसंघातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. मी जागतिक स्तरावरचं प्रदर्शन इथे भरवतो. मी गेली 25 वर्षे काम करतोय. लोकांशी माझं टच आहे. त्याचबरोबर एखाद्या साध्या माणसाचं छोटं काही काम असेल, जे वर पोहोचत नाही. त्यालासुद्धा आम्ही मदत करतो”, अशी प्रतिक्रिया राजेंद्र पवार यांनी दिली.