मुंबई: गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणात प्रतिस्पर्ध्यांविषयी द्वेषभाव वाढल्याच्या अनेक घटना पाहायला मिळत आहेत. यामधून अनेकदा सुडाचे राजकारण केले जाते. मात्र, महाराष्ट्राने वेळोवेळी राजकीय सुसंस्कृतपणा दाखवत आपण याला अपवाद असल्याचे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या एका कृतीने हा राजकीय सुसंस्कृतपणा महाराष्ट्राच्या मातीत कायम असल्याचे पुन्हा एकवार दिसून आले. एरवी भाजपवर टीका करणाऱ्या रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्या एका ट्रोलरला समज दिली. (Rohit Pawar slams twitter user for trolling Devendra Fadnavis)
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून स्वत:ला कोरोना झाल्याची माहिती दिली होती. यानंतर रोहित पवार यांनी फडणवीसांना कोरोनातून लवकरच बरे व्हा, अशा शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, रोहित पवार यांच्या या ट्विटखाली कमेंट बॉक्समध्ये काही ट्रोलर्सकडून फडणवीसांना लक्ष्य करण्यात येत होते. बिहारमध्ये आपण हारणार, हे स्पष्ट झाल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना झाल्याचे नाटक केल्याची टीका एका युजरने केली होती.
देवेंद्र जी फडणवीस यांच्याकडं जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं, त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे.
दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजप हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करतायेत. https://t.co/K04fKRjkIk— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 25, 2020
तेव्हा रोहित पवार यांनी पक्षभेद बाजूला ठेवत या व्यक्तीला योग्य शब्दांत समज दिली. देवेंद्र जी फडणवीस यांच्याकडं जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं, त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे, असे रोहित पवार यांनी सांगितले. मात्र, तुमचा दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजप हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करत असल्याची चिमटाही रोहित पवार यांनी काढला.
‘देवेंद्र फडणवीसांनी लवकर बरे व्हावे; आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान पाहिजे’
संजय राऊत यांनीही रविवारी दसरा मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांना कोरोनातून बरे होण्यासाठी आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाला आहे. फडणवीसांनी त्यामधून लवकर बरे व्हावे, असा सदिच्छा आम्ही देतो. कारण, आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते.
(Rohit Pawar slams twitter user for trolling Devendra Fadnavis)