मला नाटक जमत नाही, राजकारणात नाटक करणारे टिकत नाहीत : रोहित पवार

| Updated on: Feb 18, 2020 | 8:58 AM

"कितीही मोठे झालात तरी अहंकार येऊ देऊ नका. तो आला तर दिल्ली आणि महाष्ट्रासारखं होतं", असा टोला रोहित पवार यांनी भाजपला लगावला (NCP MLA Rohit Pawar).

मला नाटक जमत नाही, राजकारणात नाटक करणारे टिकत नाहीत : रोहित पवार
Follow us on

बुलडाणा : “माझा स्वभाव फार वेगळा आहे. मी आहे तसा आहे. मी दाखवत नाही. मला खासकरुन अॅक्टिंग जमत नाही. मला नाटक जमत नाही. राजकारणात जे नाटक करतात ते जास्त दिवस टिकत नाहीत. हे माझं मतं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण सर्वांनी हे बघितलं आहे”, असं राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडे मतदारसंघाचे आमदार रोहित पवार म्हणाले (NCP MLA Rohit Pawar). ते सोमवारी (17 फेब्रुवारी) बुलडाण्यातील युवा संवाद कार्यक्रमात बोलत होते. राजर्षी शाहू महाराज फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी या ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील युवक, युवतींच्या प्रश्नांना रोहित पवार यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

“आपल्या सर्वांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत. याबाबत माझं काही दुमत नाही. त्यासाठी हे सरकार, दुसरं सरकार किंवा कोणतंही सरकार असलं तरी जनतेच्या अपेक्षा पूर्ण व्हायला हव्यात. पण या सरकार आणि दुसऱ्या सरकारमध्ये फरक आहे. हे सरकार आपलं सरकार आहे आणि ते सरकार ‘पुन्हा येईल, पुन्हा येईल’ म्हणणारं त्यांचं सरकार आहे, अशी मिश्किल टीका रोहित पवार यांनी केली (NCP MLA Rohit Pawar).

“हे सरकार आपलं आहे असं मी यासाठी म्हणतोय की, लोकांनी नंतर कौल आपल्याबाजूने दिला. लोकं आज हे सरकार स्थापन झाल्यानंतर खूश आहेत”, असा दावा रोहित पवार यांनी केला. यावेळी युवकांशी बोलताना “कितीही मोठे झालात तरी अहंकार येऊ देऊ नका. तो आला तर दिल्ली आणि महाष्ट्रसारखं होतं. अहंकारावर नम्रता, लोकहिताचे निर्णय, लोकसंवादाचा विजय होतो हे आपण नुकतंच पाहिलंय”, असा खरमरीत टोलादेखील रोहित पवार यांनी भाजपला लगावला.