पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अतिशय खालच्या शब्दात टीका केली. त्यानंतर भडकलेल्या रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पडळकरांची तक्रार थेट मोदी-नड्डांकडे केली. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती फार वेगळी आहे, कृपया तुम्ही लक्ष घाला, अशी विनंतीच त्यांनी मोदी-नड्डांकडे केली. आता एक पाऊल पुढे टाकत रोहित पवारांनी पडळकरांना महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी कशी? हे उदाहरण देऊन पटवून दिलं आहे. (Rohit Pawar Slam Gopichand Padalkar Through Tweet Over Maharashtra Political Culture)
राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरात नवीन कार्यालय साकारलं आहे. या नवीन कार्यालयातून आता राष्ट्रवादीचं काम चालणार आहे. हेच काम नक्की कोणत्या पद्धतीने चालणार आहे?, राष्ट्रवादीचं कार्यालय कसं आहे? हे पाहण्यासाठी पुणे शहरातील भाजपचे सगळे पुढारी, मग त्यात खासदारापासून महापौरांपर्यंत आणि स्थायी समिती अध्यक्षांपासून ते अगदी पदाधिकाऱ्यांपर्यंत… हे सगळ्या जणांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट दिली. भाजपचे पुढारी पाहुणे म्हणून गेले तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी खासदार गिरीश बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. राजकारण बाजूला ठेऊन भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीचं कार्यालय गाठलं. कार्यालयाची पाहणी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी छान फोटोसेशन केलं. यातीलच एक हसरा फोटो जो महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सांगताना पुढची कित्येक वर्ष वापरला जाईल, तोच फोटो रोहित पवार यांनी ट्विट केला.
ही महाराष्ट्राची खरी राजकीय संस्कृती आहे… काही जणांना ती समजून घेण्याची गरज आहे!, एवढ्याच एका लाईनमध्ये रोहित पवारांनी पडळकरांचं नाव घेता त्यांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची समज दिली आहे.
ही महाराष्ट्राची खरी राजकीय संस्कृती आहे…
काहीजणांना ती समजून घेण्याची गरज आहे! pic.twitter.com/yvLcAEt13X
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 3, 2021
शहरासाठी नव्याने साकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस भवनला (Pune NCP Office) शुक्रवारी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), खासदार गिरीश बापट, यांच्यासह अन्य भाजप पुढाऱ्यांनी भेट दिली. नव्या कार्यालयातून पक्षाचं काम कसं चालतं, याची माहिती भाजप नेत्यांनी घेतली. ‘भाजप नेत्यांची राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट…’, ही चर्चा शुक्रवारी संध्याकाळी पुण्याच्या चौकाचौकात ऐकायला मिळत होती पण पुणेकरांना याचं काहीही नवल वाटत नव्हतं कारण पुण्याची आणि राज्याची देखील हीच तर संस्कृती आहे…
“विरोधकांनाही मान देण्याची एक स्वतंत्र राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे आणि आजवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ती संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण राज्यात भाजपचे एक ‘महान नेते’ पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करताना खालच्या पातळीवर पोहोचले आहेत…”
“आपल्याकडे स्त्री ला देवी मानून म्हणून तिची उपासना करण्याची संस्कृती आहे पण त्या ‘थोर’ नेत्याने आपल्या वक्तव्यात महिलांचा अनादरही केला आहे आश्चर्य म्हणजे राज्यातील अन्य कोणत्याही भाजपा नेत्याने त्यांना फटकारले नाही, किंवा त्यावर भाष्यही केले नाही….”
“राज्याच्या संस्कृती हे शोभा देणारं नाहीच पण माझ्यासारख्या नवीन पिढीला अशी भीती वाटते की अशा ‘महान’ नेत्याने केलेल्या वाईट विधानांमुळे राज्यातील राजकीय संस्कृती खराब होईल. आम्ही हे होऊ देणार नाही, परंतु आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनीही योग्य पावले उचलली पाहिजेत, ही आमची अपेक्षा आणि विनंती आहे….”, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं.
(Rohit Pawar Slam Gopichand Padalkar Through Tweet Over Maharashtra Political Culture)
हे ही वाचा :
पुण्याचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांचा मान, यापुढे असं होणार नाही : अजित पवार