मुंब्र्यात तो फोटो दिसताच पोलिसांनी रोखली रॅली, त्यावरुन मुस्लिम समुदायाचा पोलिसांना प्रश्न

| Updated on: Aug 15, 2024 | 1:14 PM

आज 15 ऑगस्ट. 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मुंब्र्यात सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाकडून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये एक फोटो होता. त्यावर मुंब्रा पोलिसांनी ती रॅली रोखली व फोटो काढायला सांगितला. त्यावर मुस्लिम समुदायाकडून पोलिसांना प्रश्न विचारण्यात आला.

मुंब्र्यात तो फोटो दिसताच पोलिसांनी रोखली रॅली, त्यावरुन मुस्लिम समुदायाचा पोलिसांना प्रश्न
Row in Mumbra rally
Follow us on

मागच्या काही वर्षात टिपू सुलतान या नावावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये अनेकदा वाद झालाय. टिपू सुलतान म्हैसूरचा शासक होता. टिपू सुलतान यांनी 1782 ते 1799 या काळात म्हैसूरवर राज्य केलं. टिपू सुलतान हे हिंदूविरोधी असल्याचा प्रचार करण्यात येतो. टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यावर भाजपाचा आक्षेप आहे. या मुद्यावर भाजपाने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी मालाड येथील क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचं नाव द्यायला भाजपाने विरोध केला होता. याच टिपू सुलतानच्या फोटोवरुन आज मुंब्र्यामध्ये वाद झाला.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या खाजगी संघटनेच्या वतीने मुंब्र्यात तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे पोस्टर झळकत होते, मात्र यामध्ये टिपू सुलतान यांचे देखील फोटो असलेला पोस्टर रॅलीमध्ये दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी या खाजगी संघटनेच्या रॅलीला थांबवून टिपू सुलतान पोस्टर असलेले फलक काढायला सांगितले. मात्र रॅलीमध्ये असणाऱ्या मुस्लिम समुदायाने का काढावे पोस्टर असं पोलिसांना विचारलं.

नवीन वाद उफाळण्याची शक्यता

मुंब्रा पोलिसांनी शांतता राखत कोणताही राजकीय वादविवाद होऊ नये यासाठी पुन्हा ती रॅली सुरळीतपणे सोडली. या रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राणी लक्ष्मीबाई सह इतर स्वातंत्र्यसैनिकांचे देखील पोस्टर दिसत होते. टिपू सुलतानच्या फोटोमुळे अनेक वादांना महाराष्ट्रामध्ये तोंड फुटलेले असताना स्वातंत्र्यदिनाच्या रॅलीमध्ये या फोटोवरुन नवीन वाद उफाळण्याची शक्यता.