काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज राज्यसभेत RSS वरुन एक वक्तव्य केलं, त्यावरुन मोठा गदारोळ निर्माण झालाय. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव सुरु होता, त्यावेळी खर्गे यांनी हे वक्तव्य केलं. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक मनुवादी संस्था आहे. त्यांची विचारधारा देशासाठी धोकादायक आहे. भारताच्या संस्था आरएसएसच्या ताब्यात जात आहेत. देशासाठी हा चिंतेचा विषय आहे. संघाच्या लोकांनी गांधी यांची हत्या केली” अशी वक्तव्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत केली. गोडसेला चिथावणी देऊन महात्मा गांधींची हत्या करण्यात आली, असं खर्गे यांनी म्हटलं. खर्गे यांच्या या विधानावर सभापतींनी संघाचा बचाव केला. सभापतींनी विचारलं की, “RSS चा सदस्य असणं गुनाह आहे का?. देशात RSS च खूप मोठ योगदान आहे”
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार जेपी नड्डा यांनी खर्गे यांचं हे विधान रेकॉर्डवरुन हटवण्याची मागणी केली. मल्लिकार्जुन खर्गे यांचे हे बेजबाबदारपणाच विधान आहे, असं ते म्हणाले. नड्डा म्हणाले की, “खर्गे यांना RSS बद्दल माहिती नाहीय. त्यांचं वक्तव्य निंदनीय आहे. तथ्यावर आधारीत नाही” नड्डा यांच्या मागणीनुसार, सभापतींनी खर्गे यांच हे वक्तव्य रेकॉर्डवरुन हटवण्याचे आदेश दिले. त्यानंतर खर्गे यांची ही वक्तव्य रेकॉर्डवरुन काढण्यात आली.
‘मोदी 14 देशात गेले, पण अजून मणिपूरमध्ये गेलेले नाहीत’
राज्यसभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषण चर्चेत खर्गे म्हणाले की, “राष्ट्रपतींच भाषण निवडणूक भाषण होतं. त्यांच्या अभिभाषणात कुठलही विजन किंवा दिशा नव्हती. त्यांच्या अभिभाषणात दलित, अल्पसंख्यांक वर्ग आणि मागास वर्गासाठी काही नव्हतं” “पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच महिला आणि गरीबांबद्दल बोलतात. पण मणिपूर एक वर्षापासून जळतय. मोदी 14 देशात गेले. पण अजून मणिपूरमध्ये गेलेले नाहीत. मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ घोषणा केली. पण प्रत्यक्षात त्यांनी फक्त काही लोकांना साथ दिली. गरीबांचा सत्यानाश केला” अशा शब्दात मोदी सरकारवर हल्ला चढवला.
‘मोदी सरकार आपलं अपयश लपवण्यात हुशार’
“लोकशाहीत जनता सर्वोच्च आहे. देशाच संविधान आणि जनता सर्वांवर भारी आहे” या दरम्यान त्यांना महापुरुषांच्या मुर्त्यासंसदेतून हटवण्याचा मुद्दा मांडला. ‘मोदी सरकार आपलं अपयश लपवण्यात हुशार आहे’ असं खर्गे म्हणाले. “येणारा काळ भारताचा आहे, या बद्दल कोणाचही दुमत नसेल. पण 10 वर्ष या गोष्टी फक्त भाषणातच होतायत. जमिनीवर अमलबजावणी होत नाहीय. भाजपाने प्रत्येक ठिकाणी तोडफोडीने सरकार बनवलं. दोन मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं. हेमंत सोरेन यांना हाय कोर्टाने जामीन दिलाय. अरविंद केजरीवाल यांनाही तुरुंगात टाकलं. विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकल जातय” असं खर्गे म्हणाले.