मुंबईः भाजपने आजवर ज्या ज्या पक्षांशी युती केली, तो पक्ष फोडला असा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केलाय. त्यामुळेच त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाही खबरदारीचा सल्ला दिलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप (MNS-BJP) युती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झाली. त्यानंतर शिवसेनेविरोधात हे दोन पक्ष एकत्रित लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र भाजपासोबत युती करताना खबरदारी घ्यावी, असा सल्ला खरात यांनी दिला.
राज ठाकरे यांना सल्ला देताना सचिन खरात म्हणाले, राज ठाकरेजी, भारतीय जनता पक्ष ज्या प्रादेशिक पक्षांशी युती करतो, तो पक्ष संपवतो. हे जगजाहीर आहे. याच भाजपने आसाममध्ये युती केली, त्यांना संपवलं. पंजाबमध्ये अकाली दलाशी युती केली. त्यांना संपवलं. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाशी युती केली. तिथं पक्ष संपवला. महाराष्ट्रात शिवसेनेशी युती केली. पण राज्यात उद्धव ठाकरे त्यांच्या नितीला बळी पडले नाही. बिहारमध्ये नितीश कुमार यांची भाजपसोबत युती होती. पण त्यांना कळलं हा पक्ष जेडीयूला संपवत आहे. त्यामुळे ते युतीतून बाहेर पडले. राज ठाकरे यांनी भाजपसोबत युती केल्यानंतर मनसेचे काही नगरसेवक पालिकेत निवडून येतील. पण दो दिन की चाँदनी फिर अंधेरी रात है… हे आपण ध्यानात ठेवावं, असा सल्ला सचिन खरात यांनी दिलाय…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात जवळपास एक तासभर खलबतं झाली. यात कोणत्या राजकीय मुद्द्यांवर बोलणं झालं, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र राज ठाकरे यांच्या नव्या शीवतीर्थ बंगल्यावर या वर्षी पहिल्यांदाच गणेशाचं आगमन होत आहे. या गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण दिल्याचं सांगितलं जातंय. येत्या 3 सप्टेंबर रोजी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा आहे, या पार्श्वभूमीवरही राज ठाकरेंची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.