सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायत मध्ये दहा महिन्यापूर्वी एकतर्फी सत्ता मिळवणाऱ्या रोहित पाटील गटाला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या गटाच्या सिंधुताई गावडे यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली आहे. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप पराभूत झाले आहेत.
दहा महिन्यांपूर्वी झालेल्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती.
या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी बाजी मारली होती. तर, भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे यांच्या गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र, दहा महिन्याच्या आतच खासदार संजय काका पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत मधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आणली आहे.
राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे खासदार संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे या विजयी झाल्या आहेत. संजय काका गटाच्या सिंधुताई गावडे आणि रोहित पाटील गटाचे उमेदवार राहुल जगताप यांना प्रत्येकी आठ मत मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी चिट्टी वर मतदान घेतलं यामध्ये संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे ह्या विजयी झाल्या. कवठेमहांकाळ नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असून सुद्धा खासदार संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या.
राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांना हा मोठा धक्का बसला आहे. चार नगरसेवक फुटल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप पराभूत झाले आहेत.
राष्ट्रवादीचे पहिले नगराध्यक्ष अश्विनी महेश पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागली. या निवडणुकीत खासदार संजय काका पाटील यांच्या गटातील माजी आमदार अजितराव घोरपडे यांच्या गटाचे दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला.
मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादीचे नलिनी भोसले, जयश्री लाटवडे, ज्ञानेश्वर भेंडे आणि अनिता खाडे हे चार नगरसेवक फुटून खासदार संजय काका पाटील गटात सामील झाले.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जयश्री लाटवडे ह्या नगरसेविका अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे राष्ट्रवादी आणि खासदार गटातील दोन्ही उमेदवारांना समसमान आठ मत मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी चिठ्ठीवर मतदान घेतले आणि यामध्ये खासदार संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे या विजयी झाल्या.
आठ महिन्यापूर्वी कवठेमंकाळ नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता आल्यानंतर या विजयाची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली. मात्र, आजच्या निवडणुकीतील पराभव नंतर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या सहित राष्ट्रवादीचा एकही नेता प्रतिक्रिया देण्यासाठी समोर आलेला नाही.