अजितदादा यांना मुख्यमंत्री करण्यास संघ आणि गडकरी गटाचा विरोध; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Jul 09, 2023 | 11:35 AM

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांचा एक गट शिंदे गटासोबत आल्याने राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

अजितदादा यांना मुख्यमंत्री करण्यास संघ आणि गडकरी गटाचा विरोध; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केलं. त्यांच्या बंडामागचं नेमकं कारण काय? शरद पवार यांचा या बंडामागे हात आहे काय? अजितदादा यांना मुख्यमंत्रीपद मिळणार आहे काय? भाजप आणि अजित पवार यांच्यात काय सेटलमेंट झाली? असे अनेक महाराष्ट्रातील जनतेला पडले आहेत. पडद्यामागे नेमकं काय घडलं? असा सवाल केला जात आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या घडामोडीमागचे एक एक स्फोट त्यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

YouTube video player

पृथ्वीराज चव्हाण यांनी दैनिक लोकसत्ताला मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष सुरू होता. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडणार होती हे स्पष्टच होते. या संघर्षातूनच शरद पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता, असं सांगतानाच सुप्रिया सुळेंकडे पक्षाची जबाबदारी दिली तर अजित पवार सोडून जातील का याची चाचपणी शरद पवार यांनी केली. पण सुप्रिया सुळेंकडे जबाबदारी दिल्यानंतरही अजितदादा सोडून जात नसल्याची खात्री पटल्यावर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला, असं धक्कादायक विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्रीपदावरून संभ्रम

शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्षपद दिलं. पण दुसरीकडे अजित पवार यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा सुरू केल्या होत्या. त्यांच्याशी अजितदादांच्या बैठका सुरू होत्या. प्रफुल्ल पटेल यात मध्यस्थी करत होते. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची अट ठेवली होती. त्यामुळे भाजपमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. अजित पवार यांना मुख्यमंत्री करायची की नाही हे भाजपमध्ये ठरत नव्हते. त्याचं कारण म्हणजे अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाला नितीन गडकरी यांच्या गटाचा आणि खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध होता, असं सांगतानाच अजितदादांना मुख्यमंत्री करायचे की नाही हा वाद अजूनही भाजपमध्ये सुरू आहे, असा दावाही चव्हाण यांनी केला.

काय निर्णय घ्यायचा तो घ्या

राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंड करण्यापूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती, असा दावाही त्यांनी केला. बाहेर गेलेल्या प्रत्येकाने शरद पवार यांची भेट घेतली. आम्हाला सहन होत नाही. आमचेही कुटुंब आहे, मुलंबाळं आहेत. आम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे, असं प्रत्येकाने सांगितलं. काहींनी तर आम्हाला रक्तदाब आहे. आत गेलो तर पुन्हा बाहेर येणार नाही, असं शरद पवार यांना सांगितलं. त्यामुळे पवारांनीही तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या. आता काहीही करू शकत नाही, असं सांगितलं. त्यानंतर पुढील सर्व गोष्टी घडल्या असंही त्यांनी सांगितलं.