गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (mohan bhagwat) यांनी जातीव्यवस्थेवर मोठं विदान केलं आहे. समाजाने वर्ण, जातीव्यवस्था (Varna and caste system) विसरून जायला पाहिजे. हा भूतकाळ होता. आपल्या शास्त्रांना जातीय विषमता मुळीच मान्य नाही सामाजिक समरसता हा आपला परंपरेचा भाग होता. त्यामुळे जातीभेदाचे समर्थन कधीही करता येणार नाही, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे.
विदर्भ संशोधन मंडळाच्या विद्यमाने ‘वज्रसूची-टंक’ या डॉ.मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन भागवत होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं. वर्ण आणि जातीच्या आवश्यकतेबद्दल आज कोणी विचारले तर समाजहित पाहणारा प्रत्येक व्यक्ती हेच म्हणेल आणि त्याने हेच म्हणायला पाहिजे की जे झालं तो भूतकाळ होता. ते विसरून जा. कुठल्या ही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन मान्य नाही, असं मोहन भागवत म्हणाले.
दुर्देवाने मधल्या काळात आपण धर्म सोडला. त्याचे पापक्षालन होणे गरजेचे आहे. तो काळ गेला आहे. आता संविधानाने काही बाबी निश्चित केल्या आहेत. आपल्या लोकशाहीमध्ये अनेक गोष्टींची चर्चा होणे आवश्यक आहे. दोन्ही पक्ष जाणून घेणे आवश्यक आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
हे खरं आहे की आपल्या शास्त्रांना सामाजिक विषमतेला, उच्चनीचतेला स्थान नाही. उच्च कर्म असलेला शूद्र ही श्रेष्ठ आहे आणि नीच कर्म असलेला ब्राम्हण ही श्रेष्ठ नाही. जेनेटिक्स असं सांगतात की, 80-90 पिढयांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह होत होते. त्यानंतर ते बंद होऊ लागले. गुप्त काळात हे झाले, असं सांगत भागवत यांनी एक प्रकारे आंतरजातीय विवाहांचं समर्थनही केलं.
कोणते ही विचार, पंथ, पार्टी सत्तेत बराच काळ राहिली की त्याचे शत्रू निर्माण होतात. त्याला इन्कंबंसी असे म्हणतात. आपल्या देशात असे झाले हे स्वीकार करायला हरकत नाही. आपल्या पूर्वजांनी चूक केली हे मानायला हरकत नाही, कारण सर्वांचेच पूर्वज चुका करतात, असं त्यांनी सांगितलं.