राष्ट्रीय स्वयंसेवक दलाने जातीय जनगणना आणि महिला सुरक्षे सारख्या संवेदनशील मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे. समाजाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी जातीय जनगणनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली आहे. तर महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली आहे. या विषयावर केरळच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. तसेच इतर मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली असून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
जातीनिहाय जनगणना हा संवेदनशील मुद्दा असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं आहे. जातीय जनगणनानेमुळे समाजाच्या एकता आणि अखंडतेला धोका आहे, असं संघाने म्हटलं आहे. तसेच समरसतेला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम नेटानं पुढे नेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
आपल्या समाजात जातीगत प्रतिक्रियांचा हा संवेदनशील मुद्दा आहे. राष्ट्रीय एकीकरणासाठी हे महत्त्वपूर्ण आहे. पण जातीगणनेचा वापर केवळ निवडणूक प्रचार आणि निवडणुकीच्या उद्देशाने होऊ नये. कल्याणकारी उद्देशाने त्याचा वापर झाला पाहिजे. त्यातही दलित समाजाची लोकसंख्या जाणून घेण्यासाठी सरकारने त्यांची जनगणना केली पाहिजे, असं संघाचे अखिल भारतीय प्रचारक सुनील आम्बेकर यांनी म्हटलं आहे.
या बैठकीत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्देवी घटनेवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्यातील दुरुस्तीवर संघाने यावेळी जोर दिला. महिलांची सुरक्षा हा संवेदनशील मुद्दा असल्याचं संघाने म्हटलं. महिला सुरक्षेबाबत पाच टप्प्यांमध्ये ही चर्चा करण्यात आली. कायदा, जागरूकता, संस्कार, शिक्षण आणि आत्मसंरक्षण या मुद्द्यांवर ही चर्चा झाली. या मुद्द्यांवर महिलांच्याबाबतीतील सुरक्षा मोहीम हाती घेण्याचाही निर्णय घेण्यात आला.
गेल्यावर्षी संघाने राज्य आणि जिल्ह्यात 472 महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात स्त्रीयांचे मुद्दे, पाश्चात्य स्त्रीवाद आणि भारतीय चिंतन यावर चर्चा करण्यात आली. बंगाल, वायनाड आणि तामिळनाडूतील घटनांवर या बैठकीत गंभीरपणे चर्चा करण्यता आली. बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्यांकाच्या मुद्द्यांवरूनही या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली असून त्यांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलण्याची मागणी करण्यात आली आहे. संघाने अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर सामाजिक परिवर्तनासाठी काम करण्याची योजना आखण्यात आली आहे.