Rupali Chakankar vs Chitra Wagh : चित्रा वाघ म्हणाल्या, रावणाला मदत करणारी शुर्पणखा, आता चाकणकरांकडून 4 शब्दात उत्तर

| Updated on: Oct 14, 2021 | 11:41 AM

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना रावणाला मदत करणारी शुर्पणखा, असा बोचरा वार केला. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्बत झाल्याचा बातम्या आल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करुन चाकणकरांवर बोचरी टीका केली. आता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना 4 शब्दात उत्तर दिलं आहे.

Rupali Chakankar vs Chitra Wagh : चित्रा वाघ म्हणाल्या, रावणाला मदत करणारी शुर्पणखा, आता चाकणकरांकडून 4 शब्दात उत्तर
रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ
Follow us on

मुंबई :  भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना रावणाला मदत करणारी शुर्पणखा, असा बोचरा वार केला. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्बत झाल्याचा बातम्या आल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करुन चाकणकरांवर बोचरी टीका केली. आता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना 4 शब्दात उत्तर दिलं आहे.

“माझ्या नावावर शिक्कामोर्तब वगैरे अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून ऐकते आहे. माझ्यापर्यंत कोणतीही अशी माहिती नाही. राष्ट्रवादी महिला संघटनेचं उत्तम काम सुरु आहे. मी समाधानी आहे. इच्छा वगैरे असा काही विषय नाही. चित्राताईंच्या ट्विटवर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

आज अगदी सकाळी ट्विट करुन चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांंच्यावर शरसंधान साधलं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, अशा बोचरा वार त्यांनी केला. त्यानंतर रुपाली चाकणकर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं.

दोन मिनिटांचा संवाद, 3 वेळा एकच वाक्य, ‘मला त्यांच्यावर बोलायचं नाही!’

चित्रा वाघ यांच्या ट्विटनंतर आणि बोचऱ्या टीकेनंतर टीव्ही 9 मराठीने रुपाली चाकणकर यांच्याशी संवाद साधला. आमच्या प्रतिनिधींनी चाकणकर यांना पुन्हा पुन्हा चित्रा वाघ यांच्या टीकेवर विचारण्याचा प्रयत्न केला. पण ‘मला त्यांच्यावर बोलायचं नाही’, हे एकच वाक्य त्यांनी 4 वेळा उच्चारलं. जवळपास 2 मिनिटांच्या संभाषणामध्ये त्या ‘मला त्यांच्या टीकेवर काहीही बोलायचं नाही’, या एका वाक्यावर ठाम होत्या.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी तुमचं नाव निश्चित झालंय का?, असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, “ज्या गोष्टीची मला काहीच कल्पना नाही, त्यावर मला काही बोलायचं नाही. माझ्या नावावर शिक्कामोर्तब वगैरे अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून ऐकते आहे. माझ्यापर्यंत कोणतीही अशी माहिती नाही. राष्ट्रवादी महिला संघटनेचं उत्तम काम सुरु आहे. मी समाधानी आहे. इच्छा वगैरे असा काही विषय नाही”

चित्रा वाघ- रुपाली चाकणकर अनेक वेळा आमने-सामने

धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख प्रकरणात भाजपने केलेल्या आरोपांना रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर देत पक्षातील नेत्यांसाठी बॅटिंग केली होती. आरोप होत असतात, चौकशी होते आणि दोषी असेल तर न्यायालय शिक्षा देतं, तुम्ही त्यांना अगोदरच दोषी का ठरवताय? असे सवाल चाकणकर सातत्याने भाजप नेत्यांना विचारत राहिल्या. अनेकवेळा चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये याच प्रकरणांवरुन खडाजंगीही झाली. आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकर यांचं नाव चर्चेत येताच किंबहुना अधिकृत घोषणेच्या शक्यतेअगोदरच चित्रा वाघ यांनी चाकणकरांवर घणाघाती हल्ला चढवून दोघींमधल्या वादाच्या पुढच्या अंकाची कशी सुरुवात होणार आहे, याची झलक दाखवून दिलीय.

चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, “महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजीरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका.अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल”

रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी, आज अधिकृत घोषणेची शक्यता!

गेल्या अनेक दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाच्या नावाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता ही जबाबदारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे.

गेले दीड ते दोन वर्ष हे पद रिक्त होतं. महिला अत्याचारांवरुन विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर होत असलेल्या टीकेमुळे लवकरच महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आघाडीतील महिला नेत्याची वर्णी लागणार, अशी चर्चा होती. अखेर काल (बुधवार) रात्री उशिरा चाकणकर यांच्या खांद्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देणार अससल्याचं वृत्त आलं.

(Rupali Chakankar Reply chitra Wagh on Women Commission President Post)

हे ही वाचा :