मुंबई: उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या शिवसेनेच्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या उमेदवार ऋतुजा लटके (rutuja latke) यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने त्यांना आज सकाळी राजीनामा स्विकृतीचं पत्रंही दिलं आहे. या चारओळीच्या पत्रासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टापर्यंत संघर्ष करावा लागला होता. अखेर त्याचं चीज झालं. हे पत्रं मिळाल्यानंतर ऋतुजा लटके यांनी समाधान व्यक्त करतानाच महापालिकेचेही (bmc) आभार मानले आहेत. तसेच आता थेट अंधेरीला जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. राजीनामा स्विकृती पत्रं मिळाल्यानंतर ऋतुजा लटके पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधत होत्या.
कोर्टाच्या आदेशानंतर आज सकाळी 10 वाजता महापालिकेने माझ्या हातात लेटर दिलं. राजीनामा मंजूर केल्याचं हे पत्रं आहे. त्यासाठी मी जीएडी डिपार्टमेंटचं आभार मानते. मी लिपिक आहे. आयुक्तांकडे या गोष्टी न्याव्या लागल्या याचं मला जास्त आश्चर्य वाटतंय, असं ऋतुजा लटके म्हणाल्या.
या पत्रासाठी मला संघर्ष करावा लागला. आपल्या समाजात स्त्रियांना नेहमी संघर्ष करावाच लागतो. ही छोटी सुरुवात आहे. हरकत नाही. मी जिंकण्यासाठीच उभी आहे आणि माझा विजय निश्चित होईल यात दुमत नाही, असं त्या म्हणाल्या. आता मी अंधेरीला जाणार असून उमेदवारी अर्ज भरणार आहे, असंही त्या म्हणाल्या.
भाजपकडून मुरजी पटेल उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याबाबत विचारण्यात आले असता, लोकशाही आहे. प्रत्येकजण अर्ज भरू शकतो. शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विरोधी पक्ष अर्ज भरू शकतो, असंही त्या म्हणाल्या.
मशाल चिन्हावर लढणार असल्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मशाल चिन्ह आम्हाला नवीन नाही. त्या चिन्हावर शिवसेनेकडून छगन भुजबळ 1985मध्ये लढले होते आणि विजयी झाले होते. मशाल शुभ आहे. त्यामुळे आमचा निकाल सकारात्मकच असेल, असंही त्या म्हणाल्या.
माझे पती रमेश लटके हे सर्वांना माहीत होते. अंधेरी पूर्वेत रमेश लटके कोण हे सांगायची गरज नव्हती. माझा चेहरा कुणाला माहीत नव्हता. आता मला फिरावे लागेल. माझा आणि चिन्हाचा प्रचार करावा लागेल. माझे सहकारी आहेत. ते सांगतील तसा प्रचार करू, असं सांगतानाच महाविकास आघाडी उद्धव साहेबांसोबत आहे. त्याचा आनंदच आहे, असंही त्यांनी सांगितलं.