मुंबई : आगामी निवडणुकीसाठी (Elections) सामनातून विरोधकांना साद घालण्यात आली आहे. विरोधकांची दहा तोंडे, हेच भाजपचे (BJP) बलस्थान आहे, असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून (Saamana Editorial) म्हटलंय. आधी ईडी पीडा टळावी यासाठी अग्नी पेटवा, असं आवाहनही सामना अग्रलेखातून करण्यात आलंय. शंभर आचारी रस्सा भिकारी असे घडू नये, विरोधकांच्या ऐक्याची खिचडी न पकणे, भाजपचे बलस्थान आहे, असं म्हणत शिवसेनेनं सामना अग्रलेखातून विरोधकांना एकत्र येण्यासाठी आणि एकजुटीनं लढण्यासाठी हाक दिली आहे.
भाजपच्या विरोधात एकत्र कसं यायचं, याचं उत्तर विरोधकांना शोधवं लागणार आहे. दिल्लीत सर्व भाजप विरोधकांनी एकत्र यावे आणि लढावे, एवढीच अपेक्षा आहे, असं आवाहन शिवसेनेनं केलंय. आघाडीचे नेतृत्त्व कुणी करावं, पंतप्रधानपदाचा चेहरा कोण, वगैरे नंतर पाहता येईल, असंही सामना अग्रलेखात म्हटलंय.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बरी चालली आहे, असं म्हणत शिवसेनेनं काँग्रेसचं एकीकडे कौतुक केलंय. तर दुसरीकडे महाराष्ट्रात शिवसेनेसह महाविकास आघाडी एकत्र लढली, तर लोकसभेच्या 35 जागा जिंकेल, असं राज्याचं वातावरण आहे, असंही अग्रलेखात म्हटलंय. विरोधक 2024 चं लक्ष्य ठेवतात आणि वेगवेगळ्या तोंडाने भाजपवर तोफा उडवतात, असं म्हणत टोलाही लगावण्यात आलाय.
देश भाजपमुक्त होईल की नाही हे सांगता येत नाही, पण विरोधी पक्ष एकीने राहिले नाहीत, तर त्यांना सत्तेपर्यंत पोहोचणं कठीण होणार, हे कसं नाकारता येईल, असा प्रश्नही सामना अग्रलेखातून सर्वपक्षीय विरोधकांना उपस्थित करण्यात आला आहे. ईडी पीडा टळण्यासाठी आधी अग्नी पेटवा, त्यानंतर खिडडी आपोआप शिजत जाईल, असं म्हणत सामना अग्रलेखातून सूचक विधान करण्यात आलंय.