आज मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होत असल्याने भाजपमध्ये एकाबाजूला आनंदाच वातावरण असतानाच आता पक्षातूनच एका आमदाराच्या हकालपट्टीची मागणी जोर धरु लागली आहे. भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातूनच विरोध वाढला आहे. ते भाजपचे विधान परिषदेतील आमदार आहेत. “रणजीतसिंह मोहिते पाटलांसारखी कीड भाजपात नको, त्यांची आमदारकी काढून घेऊन त्यांना पक्षातून काढा” भाजपचे प्रदेश पदाधिकारी संतोष पाटील यांनी अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
काल रणजितसिंह मोहिते पाटील हे विधिमंडळातील गटनेता निवडीसाठी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांची एकमताने विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. रणजितसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. लोकसभा निवडणुकीपासूनच मोहीते पाटील कुटुंब आणि भाजपमधील अंतर वाढलं. लोकसभा निवडणुकीत भाजपने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून तिकीट दिलं. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबाने शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली. त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील तुतारी चिन्हावर माढ्यातून लोकसभेची निवडणूक जिंकले.
पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम
माळशिरसमधून पराभूत झालेले भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनीही आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. “रणजितसिंह मोहिते पाटलांनी लोकसभा आणि विधानसभेला पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केले. त्यामुळे त्यांची आमदारकी काढून घ्या आणि पक्षातून हकालपट्टी करा” अशी मागणी केली होती. “रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा आणि पत्नी हे दोघेही राम सातपुते यांच्याविरोधात प्रचार करत होते. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांसारखी कीड पक्षात नको” असं संतोष पाटील यांचं म्हणणं आहे.