महाराष्ट्रात महाविकास आघाडीने वातावरण दूषित करण्याचं काम केलं आहे. शरद पवार यांनी 60 वर्ष मराठा समाजाला चुना लावण्याचं काम केलं आहे. पण हा चुना लावणारा माणूस यावेळी यशस्वी झाला ही गोष्ट निश्चितपणे नाकारून चालणार नाही. भविष्य काळात काही मुद्दे आम्हाला घ्यावे लागतील, असं सांगतानाच राज्यात सत्ता आली तर राज्यातील मराठा समाजाला ओबीसीत 10 टक्के आरक्षण देऊ हे शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना लिहून द्यावं, असं आव्हानच सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना दिलं आहे.
सदाभाऊ खोत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आव्हान दिलं आहे. लोकसभेतील पराभवानंतर महायुतीची बैठक झाली. या बैठकीला सदाभाऊ खोतही गेले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा केली आहे. महायुतीला ज्या कमी जागा मिळाल्या त्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. मला सरकारमधून मुक्त करावं असं फडणवीस म्हणाले असले तरी निवडणुकीची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे फडणवीस यांनी सरकारमध्ये राहिलं पाहिजे, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. येणाऱ्या विधानसभेत महायुतीचेही त्यांनी नेतृत्व केलं पाहिजे. आम्ही महायुतीसोबत कायम राहू, असं सदाभाऊ यांनी सांगितलं.
महायुतीतील सर्व घटक पक्षांनी निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलं आहे. आमच्या नेत्यांनी वेगवेगळ्या भागात जाऊन सभा घेतल्या आहेत. विधानसभेला निश्चितपणाने आमची भूमिका तिन्ही मोठ्या पक्षांसमोर मांडणार आहोत, असं ते म्हणाले.
देशाला विकासाच्या वाटेवर फक्त मोदीच नेऊ शकतात. मोदींचं नेतृत्व सक्षम आहे. संपूर्ण देश आणि जग मोदींकडे आशेने बघत आहे. इंडिया आघाडी ही लुटारुंची टोळी आहे. ही टोळीवाल्यांची आघाडी आहे. म्हणून आम्ही इस्लापूरला एक मेळावा घेतला. आमची लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. देशातील कष्टकरी जनतेला घेऊन आम्ही लढत आहोत. या निवडणुकीत अनेक बागुलबुवा निर्माण केले गेले आणि त्याचाही परिणाम या निवडणुकी झाला, असा दावा त्यांनी केला.
महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि त्यांचा सगळा कंपू हे आता जरांगेला कामाला लावणार आहेत. मनोज जरांगे यांचं आंदोलन आता विधानसभा निवडणुकीपर्यंत चालेल. आरक्षणाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी शरद पवार करत आहेत, असं सांगतानाच या निवडणुकीत आम्हाला जरांगे फॅक्टरचाही तोटा झाला आहे, असं ते म्हणाले.