Sanjay Raut : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याला संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींशी जोडलं, म्हणाले….

| Updated on: Jan 16, 2025 | 1:41 PM

Sanjay Raut : "सैफ अली खानला या सरकारने पद्यश्री दिलाय. पद्यश्री असलेला व्यक्ती या मुंबईत सुरक्षित नाही, हे आज दिसलं. अशा प्रकारचा हल्ला होणं यातून कायद्याचा धाक कोणावर राहिलेला नाही हे दिसतं. सैफ अली खानच्या हल्ला प्रकरणात सरकार उघडं पडलय" असा दावा संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याला संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींशी जोडलं, म्हणाले....
Sanjay Raut-Saif Ali Khan
Follow us on

“कायदा-सुव्यवस्था ही वाऱ्यावर आहे. सरकार निवडणुकी, सभा, संम्मेलन- उत्सव पंतप्रधानांच आगत-स्वागत, शिबीर याच्यामध्ये गुंतून पडलय. त्यामुळे बीडपासून मुंबईपर्यंत कुठे कायदा-सुव्यवस्था उरलेली नाही” अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला. ते बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. “सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला. तो मोठा कलाकार आहे. काल पंतप्रधान मुंबईत होते. सगळी सुरक्षा व्यवस्था तिथे असणार. पीएम मुंबईत असले, तरी या राज्यात काय चाललं आहे, हा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वत:ला विचारला पाहिजे. आम्ही भाष्य केलं की त्यांना यातना होतात. महाराष्ट्रात सामान्य जनतेला सुरक्षा नाहीय. घरात, झोपडी, चाळीत कुठेही चोर-दरोडेखोर घुसत आहेत” अशा शब्दात राऊतांनी सरकारचा समाचार घेतला.

“सैफ अली खानला स्वत:ला सुरक्षा व्यवस्था असणार. पण तिथे चोर घुसतात आणि हल्ला करतात हा मोदींना धक्का आहे. 15 दिवसांपूर्वी याच सैफ अली खानने सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. मोदींनी त्यांच्या कुटुंबासोबत एक तास घालवलेला. त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला होतो. तो चोराने केला की अन्य कोणी? हा पुढचा प्रश्न. या राज्यात कोणी सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झालं आहे. हे गृहमंत्र्यांनी समजून घ्यावं. राज्यातील 90 टक्के पोलीस फुटलेले आमदार, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख यांच्या संरक्षणासाठी दिले जातात. इथे सामान्य माणसाला सुरक्षा नाहीय. पण गद्दार, बेईमान आणि भ्रष्टाचाऱ्यांना सुरक्षा आहे” असं संजय राऊत म्हणाले.

‘तर इतर पक्षांना अशी संधी मिळणार का?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मुंबई दौऱ्यावर आलेले. त्यावेळी त्यांनी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधला. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच भाषण तुम्ही काळजीपूर्वक ऐका. महायुतीचा कालचा मेळावा नौदलाच्या जागेत झाला. भारतीय नौदलाच्या एखाद्या सभागृहात भाजप किंवा त्यांच्या समर्थक आमदारांचा मेळावा होत असेल, तर इतर पक्षांना अशी संधी मिळणार का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जागेत हा मेळावा होत असेल, तर ही गंभीर बाब आहे. या मेळाव्याचे पैसे कोणी भरले?. ही मुभा सगळ्यांना मिळणार आहे का?. भाजपला ही संधी देत असाल तर आम्हाला सुद्धा मिळाली पाहिजे. पब्लिक प्रॉपर्टी आहे” असं संजय राऊत म्हणाले.

‘मोदी म्हणाले तो जोक ऑफ द डिकेड’

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आमदारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, द्वेष भावना ठेऊ नका. भाजप द्वेष भावनेच कोठार आहे. आमदारांना म्हणतात, तुमची प्रतिमा जपा. ज्या पार्टीत धनंजय मुंडे, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ आणि अजित पवार आहेत, त्यांच्यावर मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. हे नेते ज्या मंचावर आहेत, तिथे पक्षाचे प्रमुख सांगतात, प्रतिमेला जपा हा जोक ऑफ द डिकेड, मोठा विनोद आहे” अशा शब्दात संजय राऊत यांनी पीएम मोदींवर टीका केली.