सांगली : सांगलीचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली. या सभेसाठी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी अगदी पहिल्या रांगेत संभाजी भिडे बसले होते. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दुसऱ्यांदा सांगलीत सभा घेतली.
सांगलीतील या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसह खासदार राजू शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेवरही जोरदार टीका केली. “काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर स्वाभिमानीची आघाडी म्हणजे मेंढयांच्या रक्षणाची जबाबदारी लांडग्यावर असल्यासारखी.”, असे मुख्यमंत्री म्हणाले.
“काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं भाषण म्हणजे काल्पनिक मुद्दे असतात. त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध नसतो. केवळ मनोरंजन असतं.” अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“ज्यांना ग्रामपंचायत लढवायची सवय आहे, ते ग्रामपंचायतच लढवणार. आपण मात्र आता लोकसभा लढवत आहोत. संजयकाका संयम सोडून नका, संयम नेहमी ठेवायचा. जनता आपल्या सोबत आहे. ज्यांना हरण्याची भीती असते, तेच शिव्या शाप देत असतात. कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या. काका त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.” असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजयकाका पाटील यांना दिला.