कोल्हापूर: राज्यसभेच्या उमेदवारीवरून (rajya sabha election) सुरू असलेल्या सस्पेन्सच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी आज मीडियाला सामोरे गेले. संभाजी छत्रपती काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, संभाजी छत्रपती यांनी अगदी दोनच शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी (cm uddhav thackeray) सविस्तर बोलणं झालं आहे. ते छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान करतील याचा मला विश्वास आहे, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. संभाजीराजे यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांच्याच कोर्टात चेंडू टाकल्याने मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे संभाजीराजेंना शह देण्यासाठी शिवसेना कोल्हापुरातून संजय पवार यांना उमेदवारी देणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे संभाजीराजेंचं टेन्शन वाढल्याचं सांगितलं जात आहे.
संभाजी छत्रपती यांनी आज अखेर मीडियाशी संवाद साधला. त्यांनी अवघ्या दोनतीन ओळीतच आपलं म्हणणं मांडलं. मी आज फक्त एका अटीवर बोलणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर बोलणं झालं आहे. पुढे काय करायचं ते सविस्तर ठरलं आहे. मुख्यमंत्री त्याप्रमाणे करतील असा मला विश्वास आहे. ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असाही मला विश्वास आहे, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेना आपल्याला अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा देतील असा संभाजीराजेंना विश्वास असल्याचं सांगितलं जात आहे. तर, संभाजी छत्रपती यांनी या निवडणुकीत थेट घराण्याचा दाखला दिल्याने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही संभाजीराजेंच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. होय, आम्ही छत्रपती घराण्याचा सन्मान राखू. पण दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असतील. अपक्ष उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसात राज्यसभेच्या निवडणुकीचं चित्रं स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेकडून कोल्हापुरातून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे संजय पवारांना शिवसेना उमेदवारी देणार की छत्रपतींच्या घराण्याचा मान ठेवत संभाजी छत्रपतींसाठी राज्यसभेची जागा सोडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.