गृह आणि परिवहन विभागानंतर आता कृषी विभागातील ‘वाझे’कडूनही कोट्यवधींची वसुली, निलंगेकरांचा गंभीर आरोप

| Updated on: Jun 23, 2021 | 2:50 PM

राज्यातील शेतकऱ्यांना लुटण्याचं, त्यांच्याकडून वसुली करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारकडून सुरु असल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला आहे. खासगी कंपन्यांना हाताशी धरत खते, बी-बियाण्यांची टंचाई निर्माण केली जात असल्याचंही निलंगेकर यांनी म्हटलंय.

गृह आणि परिवहन विभागानंतर आता कृषी विभागातील वाझेकडूनही कोट्यवधींची वसुली, निलंगेकरांचा गंभीर आरोप
भाजप आमदार संभाजी-पाटील निलंगेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकार चांगलंच अडचणीत आलं असताना आता कृषी विभागातील ‘वाझे’कडून कोट्यवधी रुपयांची वसुली सुरु असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केलाय. राज्यातील शेतकऱ्यांना लुटण्याचं, त्यांच्याकडून वसुली करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारकडून सुरु असल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला आहे. खासगी कंपन्यांना हाताशी धरत खते, बी-बियाण्यांची टंचाई निर्माण केली जात असल्याचंही निलंगेकर यांनी म्हटलंय. संभाजी पाटील-निलंगेकरांच्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. (Sambhaji Patil-Nilangekar’s serious allegation on Mahavikas Aghadi Government)

महाविकास आघाडी सरकार खासगी कंपन्यांचे दलाल म्हणून काम करत आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा या बांधावर गेल्यावर कळत असतात. मात्र, हे सरकार फक्त मुंबई आणि बांद्रापुरतं मर्यादित आहे. या सरकारला शेतकऱ्यांची काहीही देणंघेणं नाही, अशी टीकाही निलंगेकर यांनी केलीय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची फक्त घोषणा झाली. पण मागील दोन वर्षात एक रुपयाही मिळाला नाही. एकट्या बुलडाणा जिल्ह्यात जवळपास 200 कोटी रुपये खासगी कंपनीच्या घशात घातले. लातूर जिल्ह्यातील स्थितीही साखरीच असल्याचं निलंगेकर म्हणाले.

‘सरकार पळपुटं, अधिवेशनात उत्तरं देऊ शकत नाही’

11 लाख क्विंटलपैकी फक्त 2 लाख क्विंटल बियाणी महाबीज देत आहे. खासगी आणि सरकारी भावात 1 हजार 500 ते 2000 रुपयांचा फरक आहे. मुंबईतून 100 कोटी रुपये काढणारे आता एका एका जिल्ह्यात 200 – 200 कोटी रुपये काढत असल्याचा घणाघात पाटील यांनी केलाय. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कंपन्या खताऐवजी माती देतील. फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक दिवस अधिवेशन घेण्याची गरज असताना हे सरकार संपूर्ण अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळत आहे. हे सरकार पळपुटं आहे. अधिवेशनात उत्तर देऊ शकत नाही, अशी टीकाही निलंगेकरांनी केलीय.

मराठा समाजानं हक्काचं मागितले तर काँग्रेसला राग का येतो?

यापूर्वी संभाजी पाटील-निलंगेकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. “मराठा आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरले नाही, तर वेळ निघून जाईल असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाजाला सावध केले. हे काँग्रेस पक्षाला सहन झालं नाही. मराठा समाजाचे आरक्षण घालवल्यानंतर आता त्यांनी त्यांच्या हक्काचं मागितलं तरीही काँग्रेसला राग का येतो,” असा सवाल संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते संजय लाखे पाटील यांना विचारला होता.

संबंधित बातम्या :

हे तर कोरोनाच्या महालात झोपलेले भुताटकीचे सरकार; सदाभाऊ खोत यांची खोचक टीका

कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण मोफत होणार, सरकार लवकरच निर्णय घेणार; वर्षा गायकवाड यांची माहिती

Sambhaji Patil-Nilangekar’s serious allegation on Mahavikas Aghadi Government