मुंबई : राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी सहाव्या जागेसाठी आपली अपक्ष उमेदवारी घोषित केली. शरद पवारांनीही त्यांना पाठिंबा दिला. मात्र, शिवसेनेनं आपला दुसरा उमेदवार जाहीर केला आणि संभाजीराजेंची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना (Shivsena) आणि संभाजीराजे यांच्यात काही बैठकाही झाल्या. मात्र, तोडगा न निघाल्यानं संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केला. त्यानंतर आज संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी संभाजीराजे यांच्याशी विसंगत भूमिका मांडली. त्यावरुन आता राज्यात पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची चिन्हं आहेत. छत्रपतींच्या घरात भांडणं लावण्याचा, फूट पाडण्याचा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा डाव असल्याचा आरोप मराठा संघटनांकडून करण्यात आलाय.
राज्यसभेची निवडणूक लढल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केल्यापासून त्यांच्यासोबत संपूर्ण प्रक्रियेत सहभागी असल्याचा दावा करणारे छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. ‘संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबतच्या सर्व प्रक्रियेचा मी साक्षीदार आहे. शाहू महाराजांना शिवसेना, महाविकास आघाडीच्या काही हस्तकांनी चुकीच्या गोष्टी पाठवलेल्या असतील त्यामुळे ते बोललेले आहेत, असं मला वाटतं. संभाजीराजे छत्रपतींचही ट्वीट आलेलं आहे. काल त्यांनी पत्रकार परिषदेत जी भूमिका मांडली होती ती सत्य होती, शिवाजी महाराजांना स्मरुण मांडलेली होती. त्यांनी खुलं आव्हान दिलं होतं की मी खोटं बोलत असेल तर उद्धव ठाकरे यांनी समोर यावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आपण बसू आणि याबाबतीत काय ते खरं खोटं बोलू. याबाबत शिवसेनेचे प्रमुख नेते किंवा अन्य नेते काही बोलत नाही. परंतू छत्रपती घराण्यात वाद लावण्याचं काम महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलं आहे’, असा आरोप त्यांनी केलाय.
तसंच ‘शाहू महाराजांचं स्टेटमेंट येतं काय आणि शिवसेनेचे वाचाळवीर संजय राऊत म्हणतात ‘आज कोल्हापुरात सत्य जिवंत आहे, प्रामाणिकपणा शिल्लक आहे. आम्ही शाहू महाराजांचे आभार मानतो’. पिता-पुत्रात भांडणं लावताना त्यांना लाज वाटली पाहिजे. काल संभाजीराजे शिवाजी महाराजांना स्मरुण बोललेले असताना तुम्ही आज सत्य-असत्याच्या कसल्या गप्पा मारता? शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आपण जी शिवाजी महाराजांच्या नावाची रॉयल्टी खात आहात ती थांबवल्याशिवाय राहणार नाही’, असा इशाराही जाधव यांनी दिलाय.
संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटना काढल्यामुळे स्वत:ला राज्याचे सर्वेसर्वा समजणारे पवारसाहेब असतील किंवा उद्धवसाहेब असतील यांना भीती वाटलेली आहे. म्हणून ते घरात राजकारण निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोप धनंजय जाधव यांनी केला आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही’, असं ट्वीट करत संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे.
माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 28, 2022
दरम्यान, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संभाजीराजे आणि फडणवीसांवर निशाणा साधला. ‘एक स्पष्ट झालं की कोल्हापूरच्या मातीमध्ये आजही सत्य आणि प्रामाणिकपणा टिकून आहे. शाहू घराण्यानेही सत्याची कास सोडली नाही, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. शिवसेनेनं कधीही कुणाची फसवणूक केली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत फडणवीसांनी जी काल विधान केलं की आम्ही ठरवून कोंडी केली. ते विधान किती खोटं होतं हे आज स्वत: श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्ट केलं. मी त्यांचे आभार मानतो’, असं राऊत म्हणाले.