Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींचे पुत्र शहाजीराजेंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले, ‘मावळ्यांना…’

| Updated on: May 26, 2022 | 11:40 PM

संजय राऊत यांनी मावळे असतात म्हणून राजे असतात, असा टोला लगावला होता. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव शहाजीराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते आज सोलापुरात बोलत होते.

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींचे पुत्र शहाजीराजेंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले, मावळ्यांना...
शहाजीराजे छत्रपती, संजय राऊत
Image Credit source: TV9
Follow us on

सोलापूर : राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेनं दुसरा उमेदवार दिल्यानं संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांची चांगलीच कोंडी झाली. अशावेळी संभाजीराजे उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे संभाजीराजे राज्यसभा निवडणुकीतून (Rajya Sabha Election) माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेकडून संभाजीराजेंना पक्षात प्रवेश करुन शिवसेनेच्या तिकीटावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, संभाजीराजे यांनी तो फेटाळला. त्यानंतर शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेचा दुसरा उमेदवार म्हणून कोल्हापूरचेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मावळे असतात म्हणून राजे असतात, असा टोला लगावला होता. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव शहाजीराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते आज सोलापुरात बोलत होते.

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारलं असता शहाजीराजे म्हणाले की, ‘बरोबरच आहे, त्यात चुकीचं काही नाही. शिवाजी महाराजांना ताकद कुणी दिली तर मावळ्यांनी दिली. पण मावळ्यांना शिवाजी महाराजांनीच घडवलं. संभाजीराजेंच्या मागे इतक्या संघटना का आहेत? संभाजीराजेंनी मावळ्यांना दिशा दिली आणि त्यांनी ताकद परत दिली. हे एक नातं आहे’.

हे सुद्धा वाचा

‘आमच्या घरात तणावाचं वातावरण नाही’

‘सध्या सुरु असलेल्या घडामोडींमुळे लोक चिंतेत आहेत. राजेंचं काय होणार? राजे काय करणार? ते निवडणुकीतून माघार घेणार का? पण आमच्या घरात तणावाचं वातावरण नाही. काल मी आणि आई घरात काय खरेदी करायचं आहे याबाबत चर्चा करत होतो. आमचं सगळं नेहमीप्रमाणे सुरु आहे’, असंही शहाजीराजे यांनी सांगितलं.

राज्यातील घडामोडींमुळे संभाजीराजे यांच्याबद्दल जनतेच्या मनात किती प्रेम आहे हे समजतं. पण राजकारणाची चिंता रोजच्या आयु्ष्यात आणणं मला पटत नाही. आम्हीच जर आनंदी नसलो तर लोकांसाठी कसं काम करणार? असंही शहाजीराजे यावेळी म्हणाले.

संभाजीराजे कोणता निर्णय घेणार?

संभाजीराजे छत्रपती उद्या (27 मे) सकाळी 11 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे आपली पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहेत. त्यासाठी सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.

संभाजीराजेंच्या समर्थकांकडून व्हिडीओ व्हायरल

संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून तयार करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये संभाजीराजे छत्रपती यांचे रायगडावरील फोटो पाहायला मिळत आहेत. त्या फोटोसह या व्हिडीओत एक डायलॉगही ऐकायला मिळतोय. ‘शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुणा एकाचा नसतो. तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो. पण त्या आधी स्वराज्यात ही संभाजी नावाची मोहीम उभी राहिली आहे त्याचं काय? संभाजीला समजून घेण्याकरिता तुम्हाला तुमचं काळीज शिवाजीचं करुन घ्यावं लागेल. कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो’, असा डायलॉग या व्हिडीओत तुम्हाला ऐकायला मिळत आहे. त्यामुळे हा इशारा नेमका कुणाला? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.