राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत सात जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत अजित पवार गटाने 38 जणांना उमेदवारी दिली होती. संजय काका पाटील, निशिकांत पाटील, सना मलिक, झिशान सिद्दीकी आणि प्रताप चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे मुंबईतील महायुतीमधील दोन जागांचा पेच सुटला आहे. वांद्रे पूर्व आणि अणूशक्ती नगर या दोन जागा महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार ते स्पष्ट झालं आहे. वांद्रे पूर्वची जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या पक्ष प्रवेशात झिशान सिद्दीकी सुद्धा होते. काही दिवसांपूर्वी झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची वांद्र्यातच निर्घृण हत्या करण्यात आली होती. यामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात आहे. 35 वर्ष काँग्रेसमध्ये काढल्यानंतर बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होते.
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिन्ही पक्षांच्या पहिल्या उमेदवार यादीत वांद्रे पूर्वची जागा नव्हती. शिवसेना एकसंध असताना हा युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. 2009 साली सर्व बाळा सावंत निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या जर्नादन चांदूरकर यांचा पराभव केला. 2014 ला पुन्हा तेच निवडणूक जिंकले. पण त्यांच्या निधनानंतर पोट निवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडून आल्या. त्यांनी काँग्रेसच्या तिकीटवर निवडणूक लढवणाऱ्या नारायण राणे यांचा पराभव केला. वांद्रे पूर्व हा मतदारसंघ मातोश्रीच्या परिसरात येतो. 2019 साली शिवसेनेने इथून विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली. पण तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केल्यामुळे काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी निवडून आले.
ठाकरे गटातून उमेदवार कोण?
2021 मध्ये तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. वांद्रे पूर्वच्या जागेसाठी भाजपाकडून त्यांच्या नावाची चर्चा होती. पण महायुतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला आहे. झिशान सिद्दीकी काँग्रेस सोडणार हे स्पष्ट होतं. आता अजित पवार यांनी वांद्रे पूर्वमधून झिशान यांना उमेदवारी दिलीय. त्यांना सहानुभूतीच्या लाटेचा नक्कीच फायदा होईल. दुसऱ्या बाजूला मविआमधून ठाकरे गटाने इथून वरुण सरदेसाईंना उमेदवारी जाहीर केलीय.
सना मलिकला उमेदवारी
चेंबूर अणूशक्ती नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. नवाब मलिक यांच्या नावाला भाजपाचा विरोध होता. नवाब मलिक यांना उमेदवारी देऊ नये, अशी भाजपाने ठाम भूमिका घेतली होती. अखेर नवाब मलिक यांच्याजागी त्यांच्या मुलीला सना मलिकला राष्ट्रवादीने अणू शक्तीनगरमधून उमेदवारी दिली आहे.