‘शिवसेनेला अडचणीत आल्यावरच मराठी माणसाची आठवण होते’, मनसेचे संदीप देशपांडे यांचा खोचक टोला

| Updated on: Feb 17, 2022 | 5:57 PM

मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी होत आहे, पालिकेतील 90 टक्के कंत्राटदार हे अमराठी लोक आहेत, आदित्य साहेबांनी वरळीत लावलेले केम छो बॅनर, या सगळ्या प्रसंगांमध्ये त्यांना मराठी माणसांची आठवण होत नाही का? त्यांनी ज्यावेळेस उत्तर भारतीय दिवस साजरा केला तेव्हा मराठी माणसांची आठवण आली नाही का? असा सवाल देशपांडे यांनी केलाय.

शिवसेनेला अडचणीत आल्यावरच मराठी माणसाची आठवण होते, मनसेचे संदीप देशपांडे यांचा खोचक टोला
संदीप देशपांडे, मनसे पदाधिकारी
Follow us on

मुंबई : राज्यात शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या आरोपांच्या मालिकेनंतर संजय राऊतांनीही (Sanjay Raut) भाजप नेत्यांवर शेलक्या शब्दात हल्ला चढवला. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी खोचक शब्दात टीका केलीय. त्यानंतर जेव्हा जेव्हा शिवसेना अडचणीत येते तेव्हा तेव्हा त्यांना मराठी माणसाची आठवण होते, असा टोलाही देशपांडे यांनी आज लगावलाय. मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी होत आहे, पालिकेतील 90 टक्के कंत्राटदार हे अमराठी लोक आहेत, आदित्य साहेबांनी वरळीत लावलेले ‘केम छो’ बॅनर, या सगळ्या प्रसंगांमध्ये त्यांना मराठी माणसांची आठवण होत नाही का? त्यांनी ज्यावेळेस उत्तर भारतीय दिवस साजरा केला तेव्हा मराठी माणसांची आठवण आली नाही का? असा सवाल देशपांडे यांनी केलाय. तर जेव्हा जेव्हा शिवसेना अडचणीत येते तेव्हा शिवसेनेला मराठी माणसांची आठवण येते, अशी टीका देशपांडे यांनी केलीय.

मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. अशावेळी सध्या मुंबईतील राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. महापालिकेकडून प्रभार रचनेतील बदल नुकतेच जाहीर करण्यात आले. या बदलावर भाजपकडून तीव्र आक्षेप घेण्यात आलाय. दुसरीकडे मनसेकडूनही महापालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. सत्ताधारी शिवसेनेवर हल्ला चढवण्याची एकही संधी मनसे नेते सोडत नाहीत. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी मराठी माणूस या मुद्द्यावरुन शिवसेनेवर खोचक टीका केलीय. संजय राऊत यांच्याकडून किरीट सोमय्या यांच्या मराठी भाषेबाबत न्यायालयात केलेल्या याचिकेवरुन हल्ला चढवला जात आहे. हाच धागा पकडत देशपांडे यांनी शिवसेनेला टोला लगावलाय. जेव्हा किरीट सोमय्या यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. तेव्हा शिवसेना आणि भाजपा एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले होते. तेव्हा का नाही त्यांनी युती तोडली? त्यामुळे जेव्हा कधी शिवसेना संकटात असते तेव्हा त्यांना मराठी माणसांची आठवण येते, असा खोचक टोला देशपांडे यांनी लगावलाय.

‘सोमय्यांवर 420 चा गुन्हा दाखल करा!’

देशपांडे यांनी संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवरही जोरदार हल्ला चढवला होता. देशपांडे म्हणाले की, संजय राऊत हे भाजपमधील साडे तीन लोकांची नावं सांगणार होते. पण त्यातील स देखील बाहेर आला नाही. राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला होता. पण त्यांनी सर्वांची पुरती निराशा केली आहे. त्यामुळे राऊत यांच्यावर फसवणुकीचा, 420 चा गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर शिवजयंतीला बंधनं घालणाऱ्यांनी याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे की आज ज्या पद्धतीची गर्दी जमली होती, त्यामुळे कोरोना पसरणार नाही का? कोरोना पसरवायला ही गर्दी नव्हती का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं. आजची पत्रकार परिषद शिवसेनेचे नव्हती तर संजय राऊत यांची वैयक्तिक होती. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे महत्वाचे मंत्री नव्हते. तसंच आजची पत्रकार परिषद नाही तर केवळ भाषण होतं, अशी टीकाही देशपांडे यांनी केलीय. इतकंच नाही तर नेत्यांनी नातेवाईकांच्या नावे संपत्ती करु नये, जेणेकरुन अशा पद्धतीची कारवाई होणार नाही, असा खोचक सल्लाही त्यांनी दिलाय.

इतर बातम्या : 

VIDEO: ठाकरे कुटुंबाला बदनाम करून उद्धव ठाकरे यांना खुर्ची खाली करण्यास भाग पाडायचे आहे का?; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सवाल

चंद्रपूर जिल्ह्यातील सहापैकी पाच नगरपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता, पोंभुर्ण्याने भाजपची लाज राखली