बीड – क्षीरसागर (Kshirsagar) काका-पुतण्यामधील राजकीय (Politics) वाद राज्याला सर्वश्रुत आहे. मात्र गेली पाच वर्षांपासून कौटुंबिक कलह देखील राज्याने पाहिलाच आहे. एकाच बंगल्यात सर्व कुटुंब एकत्रित असले तरी एकमेकांचे चेहरे देखील न पाहणारं क्षीरसागर कुटुंब एका धार्मिक कार्यक्रमात एकत्रीत आल्याचे पहिल्यांदाच पाहावयास मिळाले आहे. नगरसेविका जयश्री विलास विधाते (Jayashree Vidhate) यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला क्षीरसागर कुटुंबातील सर्वच महिला सदस्या आमनेसामने दिसून आल्या. खरे मात्र एकमेकींनी कोणाकडेही पाहिले नाही. त्यामुळे क्षीरसागर कुटुंबातील राजकीय वादच नव्हे, तर कौटुंबिक कलह देखील वाढल्याचे पहावयास मिळाले.
नेहा संदीप क्षीरसागर, श्रुती अर्जुन क्षीरसागर आणि प्रिया हेमंत क्षीरसागर या सख्ख्या जाऊबाई आहेत. तर सारिका योगेश क्षीरसागर या सख्या चुलत जाऊबाई आहेत. या कार्यक्रमाला शिवसेना नेते योगेश क्षीरसागर देखील उपस्थित होते. मात्र आरतीदरम्यान या सख्ख्या चुलत जावा एकत्रित दिसल्या तरी त्यांनी एकमेकांना पाहणे पसंत केले नाही.
जयश्री यांचे पती असलेले सामाजिक कार्यकर्ते विलास विधाते आणि क्षीरसागर कुटुंबाचे नातेसंबंध फार जुने आहेत. कुटुंब एकत्रित असल्यापासून तर आता क्षीरसागर कुटुंब दुरावल्यानंतरही विधाते यांच्या प्रत्येक कार्यक्रमात दोन्ही क्षीरसागर कुटुंबाची उपस्थिती असते. यंदा विठुरायाच्या वारीनिमित्त तीन दिवशीय विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळानंतर हा पहिलाच कार्यक्रम जाहीर होता. त्यामुळे क्षीरसागर कुटुंब या कर्यक्रमाला उपस्थित होते.