मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांचा एका महिलेसोबतचा एक कथित व्हिडीओ भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी ट्विट केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे (sandhya sawalakhe) यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. चित्राताईना काहीच कसे वाटत नाही? तुम्हाला मी दंडवत करते तुम्ही एकसूत्री कार्यक्रम राबवत आहात. तुमच्या पक्षात काय चालू आहे यावर तुमचे लक्ष नाही. काँग्रेसमध्ये घाण नाही, घाण तुमच्या पक्षात आहे. आताचे अलिकडचे श्रीकांत देशमुख प्रकरण ताजे आहे. त्यावर तुम्ही काही बोलत नाही आहात? असा सवाल करतानाच लोकांची घरे बरबाद करण्याचा कार्यक्रम बंद करा, असा इशाराच संध्या सव्वालाखे यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे. दरम्यान, या व्हिडीओवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना तो मॉर्फ केलेला व्हिडीओ असून त्यावर आमची लिगल टीम कार्यवाही करत आहे. मुद्दाम बदनामी करण्यासाठी असे व्हिडीओ व्हायरल केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
तुमच्या पक्षात अनेक नेते आहेत कुलदीप संय्यगर सारखे त्यांची यादी वाचली तर वेळ कमी पडेल. अशा लोकांना आम्ही ठोकल्या शिवाय राहणार नाही. हे आम्ही तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, असा इशाराच संध्या सव्वालाखे यांनी चित्रा वाघ यांनी दिला आहे.
काँग्रेसमध्ये महिलांचा मानसन्मान केला जातो. नाना पटोलेंचा खोटा व्हिडीओ टाकू नका. तुम्हाला व्हिडीओच टाकायचा असेल तर समोरून शूट केलेला टाका. लोकांची दिशाभूल करू नका. नाना पटोलेंना ईडी किंवा अन्य कोणत्याच गोष्टीत अडकवता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर असे खोटे आरोप करण्यात येत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पटोले यांचा कथित व्हिडीओ टाकल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. नाना पटोले असू देत किंवा लोकप्रतिनिधी असू देत, प्रत्येकाची जबाबदारी कित्येक पटीने असते. तुमच्याकडे लोक मोठ्या आशेने बघत असतात. असा प्रकार घडल्यानंतर लोकांनी लोकप्रतिनिधींकडून काय बोध घ्यावा? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला होता. खासगी गोष्ट जेव्हा पब्लिक डोमेनमध्ये येते, तेव्हा ती खासगी राहत नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी केवळ नाना पटोले यांना प्रश्न विचारला आहे, असं त्या म्हणाल्या.
चर्चा आणि सफलता अशा दोन गोष्टी ज्या माणसाच्या मागे असतात त्याला अशा गोष्टींना समोर जावं लागतं. आमचा विधी व न्याय विभागाचा सेल आहे. तो यावर काम करत आहे. आम्ही सगळी माहिती घेत आहोत आणि हे प्रकरण कोर्टात घेऊन जाऊ. आता सध्या यावर फार काही प्रतिक्रिया देत नाही याआधी सुद्धा माझ्या विरोधात अशा प्रकारची घटना घडली आहे. माझी बदनामी करणे, त्रास देणे आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये बहुजनांचा नेतृत्व उभं होतं तेव्हा अशा परिक्षांना समोर जावं लागतं, कोण काय बोलतो त्यावर लक्ष देण्यापेक्षा आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही याला आमच्या सेलच्या माध्यमातून उत्तर देऊ. योग्य ठिकाणी उत्तर देऊ. मागच्या वेळेस मी उत्तर दिलं नाही. मात्र आता व्यक्तिगत आरोप होत असल्याने उत्तर देणार, असं नाना पटोले म्हणाले.