यवतमाळ: यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यासोबत मतभेद होते, अशी जाहीर कबुली राज्याचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिली आहे. भावना गवळी (bhavana gawali) यांच्यासोबत मतभेद होते. पण मनभेद कधीच नव्हते. आता आमच्या दोघांमध्ये कोणताच वाद नाही. भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यात कुठलेही गट तट नाहीत. आम्हाला जिल्ह्यासाठी एकत्र काम करायचे आहे. आम्ही दोघेही विकासाची कामे करत राहू, असं संजय राठोड यांनीसांगितलं. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांच्या विचारावर चाललो आहोत. त्यांचे नाव आम्ही नेहमी घेत राहणार, असंही त्यांनी सांगितलं. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर संजय राठोड आज यवतमाळला आले होते. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी राठोड यांची भव्य रॅली निघाली. त्यानंतर झालेल्या एका छोटेखानी सभेला संबोधित करताना त्यानी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
आज उत्साहात सर्वांनी माझे स्वागत केले. मी जिल्हाधिकारी कार्यालयात लगेच बैठक घेवून जिल्ह्यातील जनतेला कसा उपयोग होईल याचा प्रयत्न करणार आहे, असं संजय राठोड यांनी सांगितलं. तसेच पूजा चव्हाण प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. ती एक दुर्दैवी घटना होती. यासंदर्भात मी यापूर्वीच माझी भूमिका मांडली आहे. माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे आणि माझी अपेक्षा आहे की कुणाही हा विषय वाढवू नये. बिनबुडाचे आरोप करुन मला त्रास होईल अशी भुमिका कुणी घेवू नये. अन्यथा मी सुद्धा शांत बसणार नाही. कायदेशीर मार्गाने लढण्याची माझी तयारी आहे, असा इशारा त्यांनी चित्रा वाघ यांचं नाव न घेता दिला.
धर्मपरिषदेबाबत मी आज अधिक बोलू शकणार नाही. मला आमंत्रण आहे तर मी तिकडे जाणर आहे. त्याठिकाणी बंजारा समाजाच्या प्रश्नावर महंत भूमिका स्पष्ट करणार आहेत. मी काही शांत नव्हतो. मात्र चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी मी काही बोलत नव्हतो. लोकशाहीत आपले मत मांडणे प्रत्येकाचा अधिकार आहे मात्र कायद्यावर प्रत्येकाने विश्वास ठेवला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
हे काही शक्तीप्रदर्शन नाही आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. गेल्या 30 वर्षापासून मी येथे काम करत आहे. त्यामुळे त्यांना आनंद झाला आहे. त्यामुळे त्यांनी प्रेमाने उत्साह साजरा केला, असंही ते म्हणाले. आमच्यापैकी कुणीही नाराज नाही. या सगळ्या बातम्या आहेत. यामधे काही खरे नाही. आम्ही शिंदे साहेबांना सर्व आधिकार दिले आहेत. त्यामुळे ते ठरवतील कोणाला काय द्यायचे ते. आमच्या सर्व कार्यकर्त्यांची कामे व्हावे यासाठी यवतमाळ जिल्ह्यातही कार्यालये आम्ही करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.