मुंबई: सामनाच्या रोखठोक मधून शिवसेना नेते संजय राऊतांनी (Shivsena Sanjay Raut) शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांच्यावर चांगलाच पलटवार केलाय.2019मध्ये भाजपने शिवसेनेचे 30 उमेदवार पडले असं सामनाच्या रोखठोक मध्ये संजय राऊत म्हणालेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांना अचानक हिंदुत्वाचा आणि भाजपचा पुळका कसा आला हे समजण्यासारखं आहे असंही ते म्हणालेत. 2019 ला केसरकारांविरोधात भाजपने (BJP) राजन तेली नावाचा बंडखोर उभा केला होता. भाजपने बंडखोरांना बळ दिलं आणि याच कारणामुळे शिवसेनेचे तब्बल 30 उमेदवार पडले, शिवसेनेच्या आमदारांची संख्या कमी व्हावी व मुख्यमंत्रीपदावरील शिवसेनेचा दावा कमजोर व्हावा यासाठीच ही खेळी होती असं संजय राऊत रोखठोकमध्ये म्हटलेत. शिवाय शिंदे गटात सामील झालेल्यांपैकी असे किमान 17 आमदार असतील ज्यांना भाजपने पडण्याचा प्रयत्न केलाय हेही त्यांनी आवर्जून सांगितलंय.
ईडी चौकशी नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मलाही गुवाहाटीला येण्याची ऑफर होती. पण मी गेलो नाही. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, असं संजय राऊत म्हणाले. जेव्हा कारण नसताना चौकश्या होतात. तेव्हा आपण या चौकशांना सामोरे गेलं पाहिजे. अशावेळी तू काही केलं नाही, असं आपला अंतरात्मा सांगत असतो. निर्भिडपणे चौकशीला सामोरे जा, असंही अंतरात्मा सांगत असतो. त्याच आत्मविश्वासाने चौकशीला सामोरे गेलो. दहा तासाने बाहेर आलो. मलाही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा. ऑफरही होते. मलाही बोलावण्याचे प्रयत्न झाले ना. पण आम्ही नाही गेलो. आम्ही ठाकरे शिवसेना यांच्यासोबत राहिलो, असं संजय राऊत म्हणाले.