“…तीच संविधानाची हत्या”, आमदार अपात्रतेची सुनावणी पुढे ढकलल्यानतंर संजय राऊतांची टीका

| Updated on: Jul 15, 2024 | 12:26 PM

"आम्हाला फक्त तारखा दिल्या जात आहेत. याप्रकरणी आम्हाला जी तारीख मिळत आहे, ती तारीख म्हणजे संविधानाची हत्या आहे", असेही संजय राऊत म्हणाले.

...तीच संविधानाची हत्या, आमदार अपात्रतेची सुनावणी पुढे ढकलल्यानतंर संजय राऊतांची टीका
Follow us on

Sanjay Raut Comment on MLA Disqualification : केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिदेंना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागत याचिका दाखल केली होती. यावर आज 15 जुलै रोजी सुनावणी होणार होती. पण कोर्टाने ही सुनावणी आता पुढे ढकलली आहे. या प्रकरणावरुन खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

“तीच संविधानाची हत्या”

“आम्ही न्यायालयात दाद मागितली, तर न्यायालय तारखांवर तारखा देत आहे. महाराष्ट्रातील सरकार घटनाबाह्य बेकायदेशीर आहे, हे न्यायालयाने कितीतरी वेळा सांगितलं आहे. गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले आहे. तरीही न्यायालयात यावर अंतिम सुनावणी होत नाही. हे आपल्या न्याय व्यवस्थेचे आणि संविधानाचे दुर्दैव आहे. केंद्र सरकार संविधान हत्या दिवस साजरा करणार आहे. खरंतर महाराष्ट्रात जे सरकार सुरु आहे आणि चालवलं जातंय, तीच संविधानाची हत्या आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

“न्यायालय काही करणार आहे का?”

ज्याप्रकारे पैशाच्या बळावर क्रॉस व्होटिंग करुन घेतलं, तीसुद्धा संविधानाची हत्या आहे. यावर न्यायालय काही करणार आहे का, अमित शाह हे या देशाचे गृहमंत्री आहेत, नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान आहेत. यांना संविधानाची फार चिंता आहे ना, मग स्वत: संविधानाचे प्रतिष्ठा राहिल, अशाप्रकारचे वर्तन त्यांचे सरकार किंवा त्यांचा पक्ष करतोय का? असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

“आम्हाला संविधानिक पद्धतीने न्याय हवा”

गैरसंविधानिक पद्धतीचं सरकार ते महाराष्ट्रात चालवत आहेत. केंद्र सरकारला संविधानाची चिंता लागलेली आहे, ते या सरकारला पाठबळ देत आहे, हे या राज्याचे दुर्दैव आहे. आम्हाला संविधानिक पद्धतीने न्याय हवा आहे. आम्ही न्यायालयाला सांगत आहोत, पण आम्हाला फक्त तारखा दिल्या जात आहेत. याप्रकरणी आम्हाला जी तारीख मिळत आहे, ती तारीख म्हणजे संविधानाची हत्या आहे, असेही संजय राऊत म्हणाले.