केंद्र सरकार चारही स्तंभ मोडित काढायला निघालंय; राऊतांचा घणाघाती हल्ला

| Updated on: Aug 06, 2021 | 11:09 AM

पेगासस हे गंभीर प्रकरण असल्याचं खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही म्हटलं असून त्यावर कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. मात्र, केंद्र सरकार त्यावर चर्चा करायला तयार नाही. (sanjay raut)

केंद्र सरकार चारही स्तंभ मोडित काढायला निघालंय; राऊतांचा घणाघाती हल्ला
संजय राऊत, नेते, शिवसेना
Follow us on

नवी दिल्ली: पेगासस हे गंभीर प्रकरण असल्याचं खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही म्हटलं असून त्यावर कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. मात्र, केंद्र सरकार त्यावर चर्चा करायला तयार नाही, असं सांगतानाच हे सरकार जर सर्वोच्च न्यायालयाचं ऐकत नाही. हे सरकार देशातील चारही प्रमुख स्तंभ मोडित काढायला निघालं आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रावर चढवला. (sanjay raut criticize central government over pegasus issues)

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना पेगाससच्या मुद्द्यावरून केंद्रावर जोरदार हल्ला चढवला. विरोधी पक्ष काय सांगतो, त्यांच्याकडे काय माहिती आहे, सरकारकडे काय माहिती आहे, यावर चर्चा झाली तर हा विषय किती गंभीर आहे हे समजेल. पण सरकार सर्वोच्च न्यायालयाचंही ऐकत नसेल तर हे सरकार या देशातील चारही प्रमुख स्तंभ मोडित काढायला निघालं आहे. कुणाच्याही संदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिकपणाची नाही. जर सर्वोच्च न्यायालयाचंही ऐकायला सरकार तयार नसेल तर सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात आहे या भूमिकेत सरकार आहे. पेगाससचा विषय गंभीर आहे हे न्यायालय म्हणत असेल तर यासाठी अजून कोणत्या न्यायालयात आम्ही जायचं?, असा राऊत यांनी केला.

कृषी कायद्यावरही चर्चा नाही

आज आम्ही शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आज जाऊ. आज बैठक आहे. त्यात ठरेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकार बोलू देत नाही. त्याबाबत शेतकऱ्यांसमोर ही गोष्ट मांडू. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आमच्याकडून दुर्लक्षित झालेला नाही. कृषी कायदा आणि पेगाससबाबत आमच्या घोषणा संसदेत होत आहेत. कृषी कायद्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही नोटिसा दिल्या. पण त्या फेटाळण्यात आल्या आहेत. हे दुर्देव आहे, असं ते म्हणाले.

महापालिकेवर भगवा कायम राहील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज मनसे अध्यक्षव राज ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी दिल्लीत आहे. पेगासस किंवा स्पाय यंत्र आम्ही काही कुणाच्या पाळतीवर ठेवलेलं नाही. कोण कुणाला भेटतं, कोण कुठं चाललंय… ही काय आमची भूमिका नाही. आमच्याकडे काही पेगासस नाही. तुम्ही सांगताय माहिती आहे. पण इथं कुणी कुणावर भेटण्यावर बंधन नाही. केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून पाळत ठेवली जात आहे. आम्ही ठेवत नाही. कोणीही कुणाला भेटू शकतो. या देशात अजूनही लोकशाही असं आम्ही मानतो. ती राहिली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आमच्यावर पेगाससद्वारे पाळत ठेवली जात आहे. आम्ही दुसऱ्यांवर पाळत ठेवत नाही. महाराष्ट्राचे राजकारण पारदर्शक असते. अनेक लोक एकमेकांना भेटत असतात, असं ते म्हणाले. विरोधक मुंबईत ताकद अजमावत असेल तर अजमावली पाहिजे. महापालिकेवरील भगवा हा व्यक्तिगत स्वरुपाचा नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. तो तसाच राहणार, असंही त्यांनी सांगितलं. (sanjay raut criticize central government over pegasus issues)

 

संबंधित बातम्या:

घटनात्मक पेचप्रसंग राजभवनातच, त्यांचे बोलविते धनी कोण?; संजय राऊत यांचा सवाल

केंद्रीय मंत्रिमंडळाचा अर्धवट निर्णय, 50 टक्क्यांच्या मर्यादेवर 102 वी घटनादुरुस्ती निरुपयोगी : संजय राऊत

पेगसस प्रकरणातील आरोप गंभीर, सत्य बाहेर यायला हवं : सर्वोच्च न्यायालय

(sanjay raut criticize central government over pegasus issues)