मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीनं ताब्यात घेतलंय. आज सकाळीच ईडीचे अधिकारी राऊतांच्या निवासस्थानी दाखल झाले. तब्बल साडे नऊ तास चौकशी केल्यानंतर अखेर ईडीनं राऊत यांना ताब्यात घेतलं. या कारवाईनंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. शिवसेनेला कमजोर करण्यासाठी, माझा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई करण्यात आलीय, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली. तसंट मला अटक होऊ शकते आणि मी अटक करुन घेणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. दरम्यान, राऊतांवरील कारवाईनंतर त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिलीय. अशा गोष्टींना आम्ही भीक घालणार नाही. या गद्दांसमोर आम्ही झुकणार नाही. माझ्या कुटुंबातील प्रत्येक माणूस ठाकरेंसोबत राहणार, अशा शब्दात सुनील राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला.
सुनील राऊत म्हणाले की, ही खोटी कारवाई आहे. उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्याचा हा प्रयत्न आहे. मुलीलासुद्धा दुसऱ्या घरी नेण्यात आलं. तीचीही चौकशी झाली, पण आम्ही शिवसेना सोडणार नाही. जे पळून गेले त्यांना हा मेसेज आहे. संजय राऊत ईडीला घाबरून गेला नाही. फासावर लटकवलं तरी संजय राऊत झुकणार नाही. शेवटपर्यंत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत राहणार, अशा शब्दात सुनील राऊत यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला.
माझ्या आईचं वय 84 आहे. माझी आई कट्टर शिवसैनिक आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक माणूस ठाकरेंसोबत राहणार. आम्ही या गोष्टींना भीक घालणार नाही. या गद्दारांसमोर आम्ही झुकणार नाही, अशी टीकाही सुनील राऊत यांनी केलीय.
मी बाळासाहेब ठाकरे यांचा एक सच्चा शिवसैनिक आहे. मी लढणार, आम्ही लढू. महाराष्ट्र इतका कमजोर नाहीये आणि शिवसेना इतकी कमजोर नाहीये. विरोधकांना दाखवून देऊ शिवसेना काय आहे. हा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठीचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा, अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर निशाणा साधला.