मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने ताब्यात घेतलं आहे. आज सकाळीच ईडीचे अधिकारी (ED Inquiry) संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल झाले. तब्बल साडे नऊ तास चौकशी केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांना ताब्यात घेतलंय. संध्याकाळी 5 वाजता ईडीचे अधिकारी संजय राऊतांना (Sanjay Raut) घेऊन ईडी कार्यालयात पोहोचले. पत्राचाळ प्रकरणात राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. राऊत यांच्यावरील कारवाईनंतर आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यभरात शिवसैनिक आक्रमक बनलाय. शिवसेनेसह विविध पक्षांच्या नेत्यांनीही या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले रामदास कदम यांनी संजय राऊतांवरील ईडी कारवाईवर प्रतिक्रिया दिलीय. जे जे काही होईल त्याला सामोरं जाण्यास ते सक्षम आहेत. त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये, शरद पवारांचं नाव घ्यावं. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. त्यांची राष्ट्रवादी पुरस्कृत शिवसेना आहे. त्यांनी काही केलं असेल तर ते भोगतील, अशा शब्दात रामदास कदम यांनी राऊतांना टोला हाणलाय.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही राऊतांवरील कारवाईवर प्रतिक्रिया दिलीय. कुठलाही पुरावा मिळाल्याशिवाय कुणालाही ईडी ताब्यात घेणार नाही. कारण कोर्टाच्या पुढे जाऊन ईडीला पुरावे सादर करावे लागतात. ईडीला तपासात काही पुरावे मिळाले असतील किंवा त्यांनी जे प्रश्न विचारले असतील त्यांना संजय राऊत उत्तर देऊ शकले नसतील त्यामुळे कारवाई झाली असेल. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अनेक बिल्डरवरही कारवाई झाली आहे, असं केसरकर म्हणाले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, ईडीची कारवाई अपेक्षितच होती. महाविकास आघाडीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. शिवसेनेला असे अनेक धक्के बसतात. विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी अशा कारवाया सुरु आहेत. ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते मात्र निर्दोष होत आहेत. लोक सर्व बघत आहेत लक्षात ठेवा. लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात आहे.
विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही राऊतांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिलीय. संजय राऊतांना कोण म्हणतंय शिवसेना सोडा. शिवसेना जरी सोडली तरी तुम्हाला भाजपमध्ये घेणार नाहीत. संजय राऊतांना प्रसिद्धीचा मोह आहे. राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंची यांची शिवसेना संपवली. भाजप हा संस्कारित पक्ष आहे. एका वेगळ्या विचार धारेवर बसलेला पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेतली, नौटंकी आहे. अडीच वर्षाच्या कालावधीनंतर महाराष्ट्राचे हित जपणारे शिंदे फडणवीस सरकार आहे. संजय राऊत ईडी चौकशी दरम्यान गॅलरीतून हात दाखवण्याचा मोह संजय राऊत थांबवू शकत नाही. संजय राऊतांनी शरद पवार यांची विचारधारा स्वीकारल्यानं शपथ घ्यायची असेल तर शरद पवार यांची घ्या, असा जोरदार टोला प्रवीण दरेकर यांनी लगावलाय.